(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Thane Barvi Dam : बदलापूरचं बारवी धरण ओव्हरफ्लो, ठाणेकरांच्या वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली
Thane Barvi Dam : बारवी धरणामुळे ठाणेकरांची तहान भागते. हे धरण मागील वर्षी 9 सप्टेंबर रोजी ओव्हरफ्लो झालं होतं. मात्र, यंदा हे धरण एक महिना अगोदरच ओव्हरफ्लो झालय.
मुंबई : बदलापूरचं बारवी धरण (Barvi Dam) अखेर ओव्हरफ्लो झालं आहे. धरणातून 800 क्यूसेक प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. आमदार किसन कथोरे यांनी जलपूजन केलं असून धरण भरल्याने ठाणे जिल्ह्याची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे.
बारवी धरण पूर्ण भरल्यानंतर स्थानिक मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्यासह एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी बारवी धरणावर येऊन जलपूजन केलं. यावेळी वर्षभर पुरेल इतका जलसाठा धरणात जमा झाल्याबद्दल आमदार कथोरे यांनी समाधान व्यक्त केलं.
गेल्या काही दिवसांपासून बारवी धरणक्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे यंदा लवकरच बारवी धरण शंभर टक्के भरलं असून आते ते ओव्हरफ्टोल झालं आहे. सध्या धरणातून 800 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर धरणाचे 11 दरवाजे उघडले गेले आहेत.
बारवी धरणामुळे ठाणेकरांची तहान भागते. हे धरण मागील वर्षी 9 सप्टेंबर रोजी ओव्हरफ्लो झालं होतं. मात्र, यंदा हे धरण एक महिना अगोदरच ओव्हरफ्लो झालय.
बारवी धरणात 340 एमसीएम म्हणजेच तब्बल ३४ हजार कोटी लीटर पाणीसाठ्याची क्षमता आहे. या धरणातून ठाणे जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी, मीरा भाईंदर, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर या महापालिकांसह अंबरनाथ, बदलापूर नगरपालिका आणि एमआयडीसी, स्टेम या प्राधिकारणांना बारवी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे या सगळ्या भागाची पुढील वर्षभराची चिंता आता मिटली आहे.
बदलापूरच्या बारवी धरणक्षेत्रात यावर्षी जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे हे धरण 85 टक्के भरलं होतं. मात्र, ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसानं दडी मारल्यानं धरण भरायला उशीर झाला. अखेर गेल्या आठवडाभरात बारवी धरणक्षेत्रात झालेल्या दमदार पावसानं हे धरण पूर्णपणे भरून ओव्हरफ्लो झालं आहे. धरण भरल्यामुळं ठाणेकरांतून समाधान व्यक्त होतंय.
या धरणातून सध्या 800 क्यूसेक प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असून हे पाणी वाया जाऊ नये, यासाठी त्याचा वापर करून वीजनिर्मिती सुद्धा केली जात असल्याची माहिती एमआयडीसीचे अधीक्षक अभियंता सुधीर नागे यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या