Ambernath News : अंबरनाथमधली चार शाळकरी मुलं घरच्यांना न सांगता थेट पोहोचली गोव्याला, मौजमजा करण्यासाठी गेल्याचं समोर
Ambernath News : शाळेत जाण्याच्या बहाण्याने अंबरनाथमधील चार शाळकरी मुलं गोव्याला मौजमजा करण्यासाठी गेल्याची माहितीअपहरणाच्या भीतीने पालकांची दोन दिवस उडाली होती गाळण
Ambernath News : अंबरनाथमध्ये दहावीच्या वर्गात शिकणारी चार शाळकरी मुलं (School Students) क्लासला दांडी मारुन मौजमजा करण्यासाठी थेट गोव्याला (Goa) निघून गेल्याचा प्रकार समोर आलाय. दुसरीकडे पालकांना मात्र याची कोणतीही कल्पना नसल्यामुळे मुलांचं अपहरण (Kidnap) झाल्याच्या भीतीने पालकांची अक्षरशः गाळण उडाली होती. मात्र शिवाजीनगर पोलीस आणि रेल्वे पोलीस यांच्या संयुक्त मोहिमेत या मुलांना चिपळूण रेल्वे स्थानकात (Chiplun Railway Station) ताब्यात घेत शिवाजीनगर पोलिसांचा ताब्यात देण्यात आलं.
मुलं गोव्याच्या दिशेने निघाल्याचं तपासात निष्पन्न
अंबरनाथच्या (Ambernath) एका खासगी शाळेत दहावीच्या वर्गात ही चार मुलं एकत्र शिकतात. हे चौघेही एकमेकांचे मित्र असून त्यांनी घरी काहीही न सांगता गोव्याला फिरायला जाण्याचा प्लॅन आखला. त्यानुसार सोमवारी (24 एप्रिल) सकाळी क्लासला जाण्याच्या बहाण्याने हे चौघेही घरातून निघाले आणि क्लासला न जाता थेट गोव्याकडे निघाले. दुपारी नेहमीच्या वेळेवर मुलं घरी आली नाहीत, म्हणून पालकांनी त्यांना फोन केले असता सर्वांचे फोन बंद होते. त्यामुळे घाबरलेल्या पालकांनी थेट पोलिसात धाव घेत आमच्या मुलांना शोधून देण्याचं साकडं घातलं. ही सर्वच मुलं अल्पवयीन असल्याने पोलिसांनीही वेळ न दवडता अपहरणाचा गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली. यानंतर तांत्रिक तपासात ही मुलं गोव्याच्या दिशेने निघाल्याचं निष्पन्न झालं. त्यानुसार शिवाजीनगर पोलिसांची एक टीम गोव्यात दाखल झाली.
चिपळूणला उतरवलं, मग अंबरनाथला आणलं
मात्र इकडे एका मुलाचा घरच्यांशी संपर्क झाला आणि घरच्यांच्या भीतीने हे चौघेही दुसऱ्याच दिवशी रेल्वेने परत यायला निघाले. या प्रवासात त्यांचं लोकेशन कळल्याने शिवाजीनगर पोलिसांनी रेल्वे पोलिसांच्या मदतीने चिपळूण रेल्वे स्थानकात या चौघांनाही उतरवून घेतलं. यानंतर तातडीने या मुलांचे पालक आणि शिवाजीनगर पोलीस चिपळूणला रवाना झाले. तिथे बुधवारी (26 एप्रिल) सकाळी या मुलांना ताब्यात घेऊन अंबरनाथला आणण्यात आलं. आता कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन या मुलांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी दिली आहे.
मुलाचं समुपदेशन करण्याची गरज
मात्र केवळ मौजमजा करण्यासाठी घरच्यांचा जीव टांगणीला लावून अशा पद्धतीने फिरायला जाणं कितपत योग्य आहे? असा प्रश्न यानंतर उपस्थित झाला आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांचं समुपदेशन करण्याची आवश्यकता आहे.