Apple vs FB | यूजर्सच्या गोपनीयतेच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा फेसबुक आणि अॅपल आमने-सामने
Apple privacy policy: अॅपलने (Apple) त्यांच्या नव्या iOS मध्ये अधिक पारदर्शकता आणत यूजर्सना त्यांच्या खासगी डेटाचं संरक्षण करता यावं यासाठी सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. जाहिरातीच्या माध्यमातून पैसा कमावणाऱ्या फेसबुकने (Facebook) अॅपलच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.
Apple privacy policy: यूजर्सचा डेटा गोळा करुन त्याचा फायदा जाहिरातींसाठी करणाऱ्या फेसबुकवर अॅपलने या आधी अनेकवेळा टीका केली आहे. आता फेसबुक आणि अॅपलच्या वादाचा नवा अध्याय सुरु झाला आहे. अॅपलने त्यांच्या यूजर्सच्या खासगी डेटाचा दुरुपयोग होऊ नये म्हणून एक खास फिचर आणलं आहे. याचा परिणाम थेट फेसबुकच्या महसुलावर होणार असल्याने फेसबुकने त्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
यावर्षीच्या सुरुवातीला अॅपलने एक नवीन फिचर iOS 14 मार्केटमध्ये आणणार असल्याची घोषणा केली होती. यूजर्सचा खासगी डेटा अधिक सुरक्षीत रहावा हा या फिचरचा उद्देश आहे. त्यानुसार फेसबुक बरोबरच इतर कोणत्याही अॅपला आता अॅपलमधील डेटा वापरण्यापूर्वी यूजर्सची परवानगी घ्यावी लागणार आहे. फेसबुक हे व्हॉट्स अप, इन्स्टाग्राम आणि फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून अशा प्रकारे यूजर्सचा डेटाचा त्यांना न विचारता वापर करते, त्या डेटाच्या माध्यमातून यूजर्सवर जाहिरातींचा मारा करते आणि त्या माध्यमातून बक्कळ महसूल कमवते असा फेसबुकवर नेहमीच आरोप होतोय. आता अॅपलच्या या नव्या निर्णयाचा फटका फेसबुकला बसणार आहे.
फेसबुक गोपनीयतेचा भंग करते अॅपलचा महसूल हा जाहिरातींवर अवलंबून नाही. तो त्यांच्या अॅप स्टोअर आणि डिव्हाइस प्रोडक्टच्या माध्यमातून येतो. फेसबुकचा महसूल त्याच्या जाहिरातींवर अवलंबून आहे. त्यामुळे या कंपनीकडून यूजर्सचा मोठ्या प्रमाणावर खासगी डेटा गोळा केला जातोय. त्याला अॅपलने अनेकदा आक्षेप घेतलाय. फेसबुक आपल्या यूजर्सच्या गोपनियतेशी खेळत असल्याचं अॅपलने या आधीही आरोप केले आहेत.
फेसबुक केवळ त्यांच्या अॅपच्या माध्यमातून यूजर्सचा डेटा गोळा करत असतं तर ठिक आहे. पण फेसबुक फोन, कॉम्यूटर्स, टीव्ही आणि इतर माध्यमातून डेटा गोळा करतो यावर अॅपलचा आक्षेप आहे. तसेच फेसबुक आपल्या यूजर्सना विचारता, त्यांची परवानगी न घेता डेटा वापरते असाही आरोप अॅपलने या आधी केलाय.
फेसबुकने अॅपलच्या या नवीन फिचरवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे छोट्या व्यावसायिकांचं हित धोक्यात येण्याची शक्यता आहे असं फेसबुकनं म्हटलं आहे.
अॅपलचं मत या विरुध्द आहे. आपल्यासाठी आपल्या यूजर्सचा खासगी डेटा महत्वाचा आहे. वेगवेगळे अॅप आणि वेबसाइटवरुन त्यांचा खासगी डेटा कशा प्रकारे एकत्रित केला जातो आणि त्याचा वापर कशा पध्दतीनं करण्यात येतोय हे यूजर्सला माहित हवं असं अॅपलंने स्पष्ट केलंय.
iOS 14 मधील नव्या 'अॅप ट्रॅकिंग ट्रान्स्पेरंसी' मुळे फेसबुकला आता यूजर्सना ट्रॅक करणे आणि टारगेटेड जाहिराती करणे सहज शक्य होणार नाही. तसं करायचं असेल तर फेसबुकला पहिल्यांदा यूजर्सची परवानगी घेणं आवश्यक आहे.
अॅपलची गोपनीयतेची जाहिरात अॅपलसाठी यूजर्सची प्रायव्हसी महत्वाची आहे हे त्यांनी अनेकवेळा स्पष्ट केलंय. त्यासंदर्भात आता अमेरिकेतल्या टीव्हीवर अॅपलची एक जाहिरात दाखवली जातेय. 'Privacy.That's iPhone' अशी टॅग लाईन असणाऱ्या या जाहिरातीच्या माध्यमातून अॅपलने आपल्या यूजर्सची गोपनीयता किती महत्त्वाची आहे हे सांगितलं आहे.
अमेरिकन सरकारशी वाद अॅपलची यूजर्स प्रायव्हसी किती गोपनीय आहे याचा प्रत्यय 2015 साली आला होता. सईद रिझवान फारुक व तशफीन मलिक या दाम्पत्याने लॉस एंजलिसजवळ सॅन बर्नाडिनो या शहरातील एका सरकारी ऑफिसमध्ये बेछूट गोळीबार करून काही लोकांना ठार मारले. नंतर हे दाम्पत्य दहशतवादी विचारांशी निगडीत असल्याचं समोर आलं. त्यावेळी तपास करताना अमेरिकन गुप्तचर खाते एफबीआयला सईद रिझवान फारुक याचा आयफोन मिळाला. तो आयफोन अनलॉक असल्याने त्यातील माहितीचा शोध घेता येत नव्हता.
त्या प्रकरणात एफबीआयने देशाची सुरक्षितता महत्वाची असल्याने तो फोन अनलॉक करुन द्यावा अशी विनंती अॅपलकडे केली होती. अॅपलने देशाच्या सुरक्षेपेक्षाही आपल्या प्रायव्हसी पॉलिसीला महत्व देत त्याला नकार दिला होता. नंतर हे प्रकरण न्यायालयात गेलं होतं. त्यामुळे अमेरिकेत देशाची सुरक्षितता महत्वाची की प्रायव्हसी पॉलिसी महत्वाची यावरुन मोठा वाद झाला होता.
महत्वाच्या बातम्या:
- Facebook Fuel for India 2020 | मुकेश अंबानीनी फेसबुककडे व्यक्त केली 'ही' इच्छा
- Facebook Fuel for India 2020: मार्क झुकरबर्गला मुकेश अंबानी म्हणाले- भारताचा समावेश आता जगातल्या टॉप 3 अर्थव्यवस्थेत असेल
- Wistron Apple Factory Violence: कामगारांना योग्य वागणूक न दिल्याने अॅपलचा भारतात आयफोन निर्मिती करणाऱ्या विस्ट्रॉन कंपनीला दणका!