Wistron Apple Factory Violence: कामगारांना योग्य वागणूक न दिल्याने अॅपलचा भारतात आयफोन निर्मिती करणाऱ्या विस्ट्रॉन कंपनीला दणका!
कामगारांना योग्य वागणूक न दिल्याची गंभीर दखल अॅपल कंपनीने घेतली आहे. भारतात आयफोन निर्मिती करणाऱ्या विस्ट्रॉन कंपनीसोबतचं कंत्राट स्थगित करण्यात आलं आहे.
बंगळुरु : आयफोन बनवणाऱ्या अॅपल इन्कॉर्पोरेशनने भारतात आयफोन निर्मिती करणाऱ्या विस्ट्रॉन या तैवानच्या कंपनीसोबतचं कंत्राट स्थगित केलं आहे. गेल्या आठवड्यात म्हणजे शनिवार, 12 डिसेंबर रोजी कर्नाटकातल्या कोलार युनिटमध्ये कर्मचाऱ्यांनी पगार मिळत नसल्याबद्धल धुडगूस घातला होता. याचे पडसाद आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटले होते. त्यानंतर अॅपलच्या वतीनेही याचा तपास करण्यात आला.
तैवानच्या विस्ट्रॉननेही या प्रकाराची गंभीर दखल घेत, त्यांचे भारतातील व्हाईस प्रेसिडेंट व्हिन्सेंट ली यांची हकालपट्टी केली होती. कर्नाटकतल्या कोलारमध्ये असलेल्या विस्ट्रॉनच्या युनिटमध्ये सर्व भारतीय कामगार कायद्याचं आणि अॅपलच्या आंतरराष्ट्रीय मानकाचं व्यवस्थित पालन होतंय की नाही यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी व्हिन्सेंट ली यांची होती. मात्र, त्यांनी त्यांची जबाबदारी नीट पार पाडली नाही, म्हणून त्यांच्यावर विन्स्ट्रॉनने कारवाई केली.
पुढे अॅपलनेही या प्रकाराची गंभीर दखल घेऊन, कंपनीत तोडफोड करणाऱ्या कामागारांना पगार देण्यात आला नव्हता याची खातरजमा केली. त्यामुळेच त्यांनी विस्ट्रॉनसोबतचं काम थांबवलं आहे. अॅपल तसंच त्यांच्याशी संबंधित कोणत्याही कंपनीत कामगारांचा आत्मसन्मान जपला पाहिजे तसंच त्यांच्याशी माणुसकीने वागलं पाहिजे असे निर्देश आहेत. विस्ट्रॉनच्या कोलार युनिटमध्ये या मानवी मूल्यांची अमंलबजावणी होत नव्हती.
विस्ट्रॉननेही कामगारांना पगार न मिळाल्याबद्धल दिलगिरी व्यक्त केली आहे. पण अॅपलने त्याही पुढे जाऊन विस्ट्रॉनसोबतचं काम थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
विस्ट्रॉनकडून पगार न मिळालेल्या कामगारांनी नासधूस केल्यामुळे विस्ट्रॉनचं जवळपास 50 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा दावा केला जातोय. अॅपलच्या कोलार युनिटमध्ये धुडगूस घालणाऱ्या कामगारांकडून कमी पगारात जास्तीचं काम करुन घेणं आणि कोणत्याही सबबींशिवाय पगारात कपात करण्यात येत असल्याचे सिद्ध झालं आहे.
ऑक्टोबर आणि नोंव्हेबर महिन्यात हा प्रकार वारंवार झाल्याचं अॅपलच्या तपासात उघड झाल्याचं अॅपलच्या निवेदनात म्हटलं आहे. विस्ट्रॉनच्या कर्मचाऱ्यांकडून अॅपलने कंत्राटी कंपन्यांसाठी घालून दिलेली आचारसंहिता पायदळी तुडवली गेल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळेच या संपूर्ण प्रकाराची पूर्ण चौकशी होईपर्यंत विस्ट्रॉनला भविष्यात कोणतंही काम न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अॅपलशिवाय कर्नाटक सरकारच्या कामगार मंत्रालयाकडूनही या सर्व प्रकाराची चौकशी होत आहे. विस्ट्रॉनला कंत्राटी कामगार पुरवणाऱ्या सहा कंपन्यांचीही यासंदर्भात कर्नाटक सरकारकडून चौकशी केली जात आहे.
संबंधित बातमी :
पगार थकवल्याच्या रागातून कर्मचाऱ्यांकडून iPhone निर्मात्या कंपनीची तोडफोड; 437 कोटी रुपयांचं नुकसान
iPhone 12 Series | अॅपलकड़ून iPhone-12 सीरिजचे चारही फोन लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत