(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur Crime : एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीची छेड; चौघांविरुद्ध गुन्हा
कुख्यात अमन हा गेल्या काही महिन्यांपासून परिसरातील 19 वर्षीय मुलीच्या मागे लागला होता. दुपारी मुलगी महाविद्यालयातून घरी जात होती. यावेळी अमनने घराजवळ तिला अडविले होते. तिच्या भावालाही धमकावले होते.
नागपूरः एकतर्फी प्रेमातून कुख्यात गुन्हेगाराने एका विद्यार्थिनीची छेड काढली. यावेळी भावाने त्याला हटकल्याने त्यालाही जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना पारडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. अमन ऊर्फ मुंशी सुखदेव गजभिये (वय 22), हरदीप ऊर्फ सैराट सुरेश भालेकर (वय 38, रा. दुर्गानगर पारडी) अंकित व प्रणीत अशी आरोपींची नावे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुख्यात गुन्हेगार असलेला अमन हा गेल्या काही महिन्यांपासून परिसरातील 19 वर्षीय मुलीच्या मागे लागला आहे. त्याचा एकतर्फी प्रेमातून तो मित्रासह तिचा पाठलाग करणे आणि तिची छेड काढत असतो. शनिवारी दुपारी मुलगी महाविद्यालयातून घरी जात होती. यावेळी अमनने घराजवळ तिला अडविले. 'मी तुझ्यावर प्रेम करतो. मला तुझा मोबाईल क्रमांक दे, तु माझ्याशी बोलत जा', असे तो तिला म्हणाला. त्यामुळे विद्यार्थिनी घाबरली. ती धावत घरी गेली.
भावाला माहिती दिली. तिचा भाऊ घराबाहेर आले. यावेळी अमन व त्याचे तीन साथीदार घराबाहेरच उभे होते. यावेळी त्याने मला तू ओळखत नाही, मी दोन खून केले असून आता तुझा नंबर आहे, असे म्हणत त्याला मारहाण केली. दरम्यान त्याचा मित्र आला असता, त्यालाही मारहाण करीत, अमन पसार झाला. दरम्यान पीडित विद्यार्थिनी व तिच्या भावाने पारडी पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी चौघांविरुद्ध विनयभंग, मारहाण व ठार मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला असून चौघांचा शोध सुरू केला आहे.
अमनवर अनेक गंभीर गुन्हे
अमन उर्फ हा कुख्यात गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध खून, जीव घेण्याचा प्रयत्न आदींसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. अनेक प्रकरणात तो पोलिसांना हवा असताना खुलेआम तो परिसरात फिरुन नागरिकांना धमकावित असल्याने परिसरात त्याची दहशत निर्माण झाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या