विठ्ठलाच्या मूर्तीची झीज! मूर्तीवर लावणार इपॉक्सी लेप, तर गाभाऱ्यातील दगडांवर होणार रासायनिक प्रक्रिया, मुखदर्शन सुरु राहणार?
एका महिन्यापूर्वी पुरातत्त्व खात्याच्या रासायनिक विभागाकडून विठ्ठल मूर्तीची पाहणी करण्यात आली होती. त्यांनी नुकताच अहवाल दिला असून, यामध्ये विठ्ठलाच्या मूर्तीची झीज झाल्याचं सांगण्यात आलं आहे.
सोलापूर : वारकऱ्यांचं आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठलाच्या (Shri Vitthal) दर्शनासाठी दररोड लाखो भाविका येतात. यावेळी विविध उपचार आणि पायावरच्या दर्शनामुळं विठुरायाच्या मूर्तीची पुन्हा मोठ्या प्रमाणात झीज होत असल्याचे समोर आलं आहे. एका महिन्यापूर्वी पुरातत्त्व खात्याच्या रासायनिक विभागाकडून विठ्ठल मूर्तीची पाहणी करण्यात आली होती. त्यांनी नुकताच अहवाल दिला असून देवाचे पाय आणि कमरेच्या मागचा भाग या ठिकाणी झीज झाल्याची माहिती या अहवालात सांगण्यात आली आहे. त्यामुळं आता पुन्हा एकदा विठ्ठलाच्या मूर्तीवर इपॉक्सी लेप लावावा लागणार आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आज झालेल्या मंदिर समितीच्या बैठकीत चर्चा होऊन पुरातत्त्व विभागाचा अहवाल राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे. राज्य शासनाकडून ज्या पद्धतीनं परवानगी मिळेल यानंतर मंदिर समितीच्या बैठकीत विठ्ठल मूर्तीला लेप लावण्याचा दिवस ठरवण्यात येणार असल्याचेही कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले. साधारण 2020-21 या कोरोना काळात विठ्ठल रुक्मिणी मूर्तीला एपॉक्सीचा लेप दिला होता. या काळात मंदिर बंदच असल्याने फारसा त्रास जाणवला नव्हता. आता पुन्हा एकदा एक महिन्यापूर्वी पुरातत्व विभागाने या पद्धतीने विठ्ठल मंदिराच्या मूर्तीला लेपन करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार आता विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीला एपॉक्सीचा लेप द्यावा लागणार आहे. यापूर्वी केलेल्या लेखनाला आता साधारण चार वर्ष झाली आहेत. त्यामुळं आता पुरातत्त्व विभागाला यावेळी विचारपूर्वक लेपनाची क्रिया करावी लागणार आहे.
दोन ते तीन दिवस विठुरायाचे मुखदर्शन चालू ठेवण्याबाबत विचार सुरू
विठ्ठल मंदिरात सुरु असलेल्या मंदिर जतन व संवर्धनाच्या कामांमध्ये विठ्ठल गाभाऱ्यातील दगडांनाही रासायनिक लेपन करावे लागणार आहे. यासाठी सुरुवातीला रासायनिक द्रव्याने दगड कसे साफ करावे लागणार असून यानंतर पाण्याने हे दगड धुवावे लागणार आहे. गाभाऱ्यातील हे दगड वाढल्यानंतर पुन्हा या दगडांना रासायनिक लेपन प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे. यामुळं दगडातून विषारी वायू बाहेर पडण्याची शक्यता असल्याने लेपन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आठ ते दहा तास गाभाऱ्यात भाविकांना जाता येणार नाही. आता जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जी बैठक होईल त्या बैठकीत गाभाऱ्याला रासायनिक लेपन करण्याबाबतचा निर्णय होणार आहे. ही रासायनिक प्रक्रिया केल्यानंतर साधारण सहा ते आठ तास गाभाऱ्यात कोणालाही जाता येणार नसल्याने दोन ते तीन दिवस विठुरायाचे मुखदर्शन चालू ठेवण्याबाबत विचार सुरू आहे. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या बैठकीत घेतला जाणार असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या:























