Satara : मनाली अपघातातील 'ते' 50 ट्रेकर्स सुखरुप सातारमध्ये पोहोचले, जिल्हा प्रशासकीय यंत्रणेच्या प्रयत्नांना यश
मनाली येथे ट्रेकिंगचे ट्रेनिंग घेणासाठी गेलेल्या ट्रेकर्स बसला अपघात झालेल्या सर्वांना सुखरुप साताऱ्यात आणण्यात सातारा जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. या अपघातात 10 ते 12 जण किरकोळ जखमी झाले होते.
सातारा : मनाली येथे ट्रेकिंगचे ट्रेनिंग घेणासाठी गेलेल्या ट्रेकर्स बसला अपघात झालेल्या सर्वांना सुखरुप साताऱ्यात आणण्यात सातारा जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. या अपघातात 10 ते 12 जण किरकोळ जखमी झाले होते. अपघातानंतर सर्व ट्रेकर्स घाटात अडकून पडले होते, कोणतेही वाहन थांबत नव्हते. मात्र, सातारा प्रशासकीय यंत्रणेच्या जोरदार हालचालीनंतर ट्रेकर्स सुखरुप घरी परतले आहेत.
सातारा जिल्ह्यातील गेल्यावर्षी झालेल्या भुस्खलनावेळी आपत्कालीन टीम येईपर्यंत सर्वांना हातावर हात ठेवून बघत बसण्याची वेळ येत होती. स्थानिक ग्रामस्थांनी जसे जमेल तसे मदतकार्य करुन लोकांना मदत केली होती. या मदतकार्यात काही ग्रामस्थांना जायबंदी व्हावे लागले, तर काहींना आपला जीवही गमवावा लागला. हाच अनुभव लक्षात घेता सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी अटलबिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ मऊंन्टेनेअरिंगच्या अंतर्गत सातारा जिल्हा परिषदेला दिलेल्या आदेशानंतर सातारा जिल्ह्यातील 50 जणांची टीम दिनांक 8 मे रोजी मनाली या ठिकाणी ट्रेनिंगसाठी पाठवली होती.
परतीच्या मार्गावर असताना मनालीजवळ अपघात
या सर्वांचे 11 तारखेनंतर ट्रेनिंग सुरु झाले होते. चार आठवड्याचे ट्रेनिंग संपवूण हे सर्वजण परतीच्या मार्गावर असताना मनालीजवळील मंडी जिल्ह्यातील एका तालुक्यात दुर्घटना होऊन घाटात बसला अपघात झाला. यात सुमारे 10 ते 12 जण गंभीर जखमी झाले. त्या भाड्याने घेतलेल्या बस चालकाचा एक हातही निकामी झाला होता. या अपघाताची माहिती एबीपी माझाने दाखवल्याने सर्व प्रशासकीय यंत्रणेला समजले. त्यानंतर सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी तातडीने बैठक बोलावून डॉ. किरण जाधव आणि डॉ. संजय जाधव यांच्यासह एक टीमला तातडीने मदतीसाठी दिल्लीला रवाना केले.
सातारचे खासदार आणि सातारा जिल्हाधिकारी ठरले किंगमेकर
सातारचे खासदार श्रीनिवास पाटील यांना सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या अपघाताची माहिती दिल्यानंतर खासदार स्वतः जिल्हा परिषदेत आले. अपघातातील सर्व ट्रेकर्स जेव्हा दिल्लीत पोहोचले तेव्हा खा. पाटील यांनी या सर्वांची राहण्यासाठी दिल्लीतील महाराष्ट्र भवन आणि सिक्कीम भवन उपलब्ध करुन दिले. तेथेच या सर्वांची जेवणाचीही सोय करुन दिली. त्यांनंतर खा. पाटील यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी दुरध्वनीवरुन संपर्क साधून रेल्वेचा एक डबा बुक करण्याची विनंती केली. त्यानंतर काही वेळातच त्यांना "OK" मेसेज आला आणि हे सर्वजण एकत्रित दिल्ली ते सातारा असा प्रवास करु शकले. या प्रक्रियत मात्र खरे किंगमेकर ठरले ते सातारचे खा. श्रीनिवास पाटील आणि जिल्हाधिकारी शेखर सिंह.
सातारा प्रवासाकरीता ट्रेनची एक बोगी आरक्षित
ही सर्वजण दिल्लीला पोहचेपर्यंत ट्रेनिंगसाठी गेलेल्या 50 जणांच्या टीमला घाटातून तालुक्याच्या ठिकाणी आणण्यासाठी सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी मंडी जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून खास वाहनाची सोय उपलब्ध करुन दिली. सर्व ट्रेकर्स दिल्लीत पोहोचेपर्यंत शेखर सिंह यांनी दिल्ली ते सातारा प्रवासाकरीता ट्रेनची एक बोगी आरक्षित करुन घेतली. यासाठी रेल्वे मंत्रालयानेही सहकार्य केले. एक बोगीचे आरक्षित केल्यानंतर सर्वांना एकाच बोगीमध्ये घेण्यात आले.
जखमी झालेल्या ट्रेकर्सना जिल्हा रुग्णालयातील डॉ. किरण जाधव, जिल्हा परिषदेचे ग्रामविकास अधिकारी डॉ. संजय जाधव यांनी ट्रेनमध्येही उपचार दिले. या सर्वांना सुखरुप साताऱ्यात आणण्यात आल्यानंतर सर्वांना सुखरुप वाहनाने घरपोच सेवा दिली. सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी विनय गौडा जी सी यांनी खास परिश्रम घेतले. या अपघातानंतर सर्वांसोबत संपर्कात राहिलेले महाबळेश्वर ट्रेकर्सचे सुनिलबाबा भाटिया यांनीही प्रशासकिय यंत्रणेचे खास आभार मानले.
इतर महत्त्वाच्या बातम्या