Chandrahar Patil : ज्यांच्यासाठी ठाकरेंनी काँग्रेसशी पंगा घेतला, आघाडीही तोडण्यावर आले... तेच पैलवान चंद्रहार पाटील शिंदेंच्या गळाला?
Chandrahar Patil Meet Eknath Shinde : उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने सांगलीचे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत.

सांगली : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) आता उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. त्याला निमित्त आहे ते म्हणजे चंद्रहार पाटील यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची कुडाळमध्ये घेतलेली भेट. इतकंच नव्हे तर त्यांनी शिंदेंच्यां पंक्तीला बसून जेवणाचा आनंदही घेतला. त्यामुळे चंद्रहार पाटील आता शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा सुरू आहे.
गुरुवारी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी कुडाळमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्थीने ही भेट घडून आली. त्यामुळे ठाकरेंच्या पैलवानानं शिवबंधन तोडण्याचे संकेत दिल्याची चर्चा आहे. याच चंद्रहार पाटलांसाठी सांगली लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी काँग्रेसशी पंगा घेतला होता. पण आता हेच पाटील एकनाथ शिंदे यांच्या गळाला लागल्याची चर्चा आहे.
चंद्रहार पाटलांसाठी ठाकरेंचा काँग्रेसशी पंगा
लोकसभा निवडणुकीवेळी सांगलीची जागा चांगलीच चर्चेत आली होती. त्या जागेवरुन महाविकास आघाडी तुटतेय की काय अशीही चर्चा सुरू झाली होती. त्याला कारण होतं ते म्हणजे चंद्रहार पाटलांची उमेदवारी. कोल्हापूरची ठाकरेंची जागा ही काँग्रेसच्या शाहू महाराजांना देण्यात आली. त्या बदल्यात ठाकरेंनी सांगलीच्या जागेवर दावा सांगितला आणि चंद्रहार पाटलांची उमेदवारी परस्पर घोषित केली. त्याच जागेवर काँग्रेसचे विशाल पाटीले हे तयारी करत होते आणि विश्वजीत कदमांची ताकद त्यांच्यामागे होती.
सांगलीची जागा ही कोणत्याही परिस्थितीत आपल्याकडेच राहिली पाहिजे यासाठी ठाकरे कमालीचे आग्रही होते. त्यासाठी त्यांनी काँग्रेसशी उघड उघड पंगा घेतला. विश्वजीत कदमांनी आणि विशाल पाटलांनी दिल्लीचे उंबरठे झिजवले. परंतु भाजपचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीने एकत्रित लढणे गरजेचं असल्याने त्यांना काँग्रेसमधून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी ही जागा ठाकरेंकडेच गेली.
विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. त्याला विश्वजीत कदमांसह काँग्रेसच्या नेत्यांचा छुपा पाठिंबा मिळाला. त्या जोरावर विशाल पाटील हे निवडून आले आणि ठाकरेंचे चंद्रहार पाटील हे तिसऱ्या क्रमांकावर गेले. चंद्रहार पाटील यांना दखल घेण्याजोगीही मतं मिळाली नाहीत.
चंद्रहार पाटील शिंदे सेनेच्या वाटेवर?
ज्या चंद्रहार पाटलांसाठी ठाकरेंनी काँग्रेसशी पंगा घेतला तेच चंद्रहार आता शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याचं दिसतंय. कुडाळमध्ये त्यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली. इतकंच काय तर त्यांच्यासोबत ते जेवायलाही बसले. यावेळी सेनेचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. त्यामुळे चंद्रहार पाटील आता शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा सुरू आहे.






















