72 वर्षीय आजोबांच्या धावण्याचा वेग बघा!
रामकशिन शर्मा यांनी धावण्याच्या शर्यतीत आतापर्यंत देशविदेशातील मिळून 191 पदकं मिळवली आहेत. यामध्ये 70 सुवर्णपदकांचाही समावेश आहे.
![72 वर्षीय आजोबांच्या धावण्याचा वेग बघा! Ramkishan Sharma 72-YEAR OLD RUNNER WHO HAS WON 191 MEDALS from HARYANA 72 वर्षीय आजोबांच्या धावण्याचा वेग बघा!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/05/ed323e6c68e6d0dc45d2b6ddf0d2e9f91685964634963291_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
चंदीगड : हरियाणातील 72 वर्षीय रामकिशन शर्मा (Ramkishan Sharma) यांनी अनोख्या पराक्रमाने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. 72 वर्ष वय असूनही रामकिशन शर्मा यांचा धावण्याचा वेग इतका आहे, की तरुणांनाही लाजवेल. रामकशिन शर्मा यांनी धावण्याच्या शर्यतीत आतापर्यंत देशविदेशातील मिळून 191 पदकं मिळवली आहेत. यामध्ये 70 सुवर्णपदकांचाही समावेश आहे.
रामकिशन शर्मा हे हरियाणातील चरखी दादरी गावात राहतात. ते दररोज न चुकता वाऱ्याच्या वेगाने धावण्याचा सराव करतात. ते सुद्धा कच्च्या रस्त्यावर. 72 व्या वर्षी अनेकांना जागेवरुन हलताही येत नाही. त्या वयात रामकिशन सुसाट धावतात. त्यामुळे त्यांना हरियाणात ओल्ड बॉय या नावाने ओळखले जातं.
कुठे कुठे स्पर्धा जिंकल्या?
रामकिशन शर्मा यांनी अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु स्टेडियम हे त्यांचं आवडतं मैदान आहे. या मैदानात त्यांनी चार सुवर्णपदकं पटकावली आहेत. तिकडे गुरुग्रामच्या देवी लाल स्टेडियममध्ये त्यांनी एक-दोन नव्हे तर तब्बल 7 सुवर्ण पदकांची कमाई केली. ही राष्ट्रीय स्पर्धा होती. आतापर्यंत 191 पदकं जिंकली आहेत. यामध्ये तीन आंतरराष्ट्रीय सुवर्णपदकं आहेत. याशिवाय रामकिशन यांनी 20 रौप्य , 5 कांस्य आणि 70 राज्य पातळीवरील सुवर्णपदकं पटाकवली आहेत.
गावातीलच म्हाताऱ्या-कोताऱ्यांना धावताना बघून, रामकिशन शर्मा यांनीही धावण्याचा चंग बांधला. त्यांनी धावण्यात सातत्य ठेवलं. गावातील कच्च्या रस्त्यावर ते दररोज धावतात. या वयात रामकिशन यांचा धावण्याचा वेग पाहून, भले भले अचंबित झाले
रामकिशन यांच्या घरी, जिंकलेल्या पदकांचा आणि प्रमाणपत्रांचा अक्षरश: ढिग लागला आहे. जर तुम्ही एखादी गोष्ट मनात आणली, तर तुम्ही अशक्यही शक्य करु शकता... त्यासाठी तुम्हाला वयाची बाधा येत नाही, केवळ तुमचा निर्धार पक्का हवा, हेच रामकिशन यांनी दाखवून दिलंय.
अख्ख्या गावाला अभिमान
रामकिशन शर्मा यांच्या पराक्रमाचा अख्ख्या गावाला अभिमान आहे. रामकिशन यांच्याबाबत गावचे लोक भरभरुन बोलतात. "रामकिशन शर्मा यांनी केवळ आमच्या गावचंच नाही तर संपूर्ण हरियाणाचं नाव काढलं आहे. त्यांनी मिळवलेल्या मेडल्सनी आमच्या गावाची शोभा वाढवली आहे. यापुढेही ही शोभा अशीच वाढत राहो, अशी आमची इच्छा आहे. हा आमच्या गावाचा आणि हरियाणाचा गौरव आहे", असं हरियाणातील चरखी दादरी गावच्या सरपंचांनी सांगितलं.
VIDEO: रामकिशन यांचा धावण्याचा वेग
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)