(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रायगडच्या भाजप जिल्हाध्यक्षांवर महिलेचा आरोप, पहिल्या पत्नीशी घटस्फोट झाल्याचं सांगत दुसरं लग्न केल्याची तक्रार
Raigad News : रायगडच्या भाजप जिल्हाध्यक्षांवर फसवणुकीचा आरोप करत तक्रारदार महिलेने राज्य महिला आयोगाकडे दाद मागितली आहे.
सोलापूर: भाजपचे सोलापूरचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचे फसवणुकीचे प्रकरण ताजे असताना भाजपच्या आणखी एका नेत्यावर महिलेने फसवणुकीचा आरोप केला आहे. या प्रकरणात पोलिसांकडून कोणतेही सहकार्य मिळत नसल्याचा आरोप करत महिला आयोगाकडं देखील दाद मागितल्याची माहिती तक्रारदार महिलेनं दिली आहे.
तक्रारदार महिला ही मूळची सोलापुरातील आहे. 2011 साली महिलेचे लग्न झाले होते. मात्र काही कारणामुळे महिला आणि तिच्या पतीमध्ये वाद सुरु होते. अशात दक्षिण रायगडचे भाजप जिल्हाध्यक्ष असलेल्या महेश मोहिते यांच्याशी तक्रारदार महिलेची ओळख झाली. महेश मोहिते यांनी स्वतः देखील घटस्फोटीत असल्याचे सांगितले. तशी कागदपत्रं देखील त्यांनी दाखवली. त्यानंतर 2015 मध्ये या महिलेशी विवाह देखील केला.
महेश मोहिते यांना या तक्रारदार महिलेपासून एक मुलगी देखील झाली. त्यानंतर मोहिते यांचा पहिल्या पत्नीशी घटस्फोट झालाच नसल्याचे तक्रारदार महिलेच्या लक्षात आलं. तसेच पहिल्या पत्नीपासून मोहिते यांना दोन अपत्यं देखील आहेत. तिसऱ्या अपत्यामुळे राजकीय करियर संकटात येईल. त्यामुळे मुलीची ओळख लपवून ठेवण्यासाठी सदर महिलेवर दबाव आणण्यास सुरुवात केली, त्यातून धमक्याही दिल्याचा आरोप देखील सोलापुरातील तक्रारदार महिलेने केला आहे.
या संदर्भात नवी मुंबईतल्या खांदेश्वर पोलिसांत तक्रारदार महिलेने तक्रार देखील दिली होती. मात्र पोलिसांनी या प्रकरणाची योग्य तक्रार न घेतल्याने महिला आयोगाकडे देखील तक्रार केली. महेश मोहिते यांचे राजकीय प्रस्थ मोठे असल्याने पोलिसांकडून या प्रकरणाकडे दुर्लक्ष केलं जातं असल्याचा आरोप महिलेने केला. दरम्यान, या प्रकरणात गुन्हा दाखल करून योग्य न्याय मिळावा अशी मागणी तक्रारदार महिलेने केली. तसेच देवेंद्र फडणवीस, किरीट सोमया यांच्याकडे देखील महिलेने मदतीची याचना केली आहे.