Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
तरुणांचे प्रश्न बघून सर्व घटकांना आकर्षित होईल या अनुषंगाने हे गाणं बनविण्यात आले आहे. त्यामुळे, या अभियानापुरते हे गाणं असेल, पण बराच काळ हे गाणं चालेल,
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आपला ट्विटरवरील डीपी बदलल्याची चांगलीच चर्चा रंगली होती. विशेष म्हणजे आजची पत्रकार परिषद घेण्यापूर्वीच त्यांनी डीपी बदलल्यामुळे नेमकं काय कारण आहे, याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. हक्क मागतोय महाराष्ट्र या आशयासह त्यांनी वज्रमुठ असलेलं चिन्ह डीपीवर ठेवलं होतं. अखेर त्यांच्या डीपी बदल्यामागचं कारण उलगडलं आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून (NCP) हक्क मागतोय महाराष्ट्र हे टायटल साँग आज रिलीज करण्यात आलंय. सरकारविरोधी भूमिका दर्शवणारं हे प्रचारगीत आणि जाहिरात साँग लॉन्च करण्यात आलंय. विशेष म्हणजे हक्क मागतोय महाराष्ट्र हे गाणं शरद पवार गटाचं यंदाच्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सरकारविरोधी प्रचार गीत असेल. या गाण्यात रॅप आणि लोकसंगीताचं फ्युजन करण्यात आलंय, त्याद्वारे तरुण आणि समाजातल्या सर्व घटकांना आकर्षीत करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने केलाय.
तरुणांचे प्रश्न बघून सर्व घटकांना आकर्षित होईल या अनुषंगाने हे गाणं बनविण्यात आले आहे. त्यामुळे, या अभियानापुरते हे गाणं असेल, पण बराच काळ हे गाणं चालेल, असे जयंत पाटील यांनी सांगितले. सरकारच्या गलथान कारभाराची चार्जशीट आम्ही घरोघरी वाटणार आहोत. हक्क मागतोय महाराष्ट्र या मोहिमेचं गाणं घेऊन प्रचार करणार आहोत. या गाण्यातून बेरोजगारी, महिला असुरक्षा, शेतकरी प्रश्न, महागाईवर भाष्य करण्यात आलं असून महाराष्ट्रभर आंदोलन करणार असल्याचही जयंत पाटील यांनी म्हटलं. महाराष्ट्राचं वैभव महायुतीनं सरकारनं घालवलंय, ते परत मिळवण्याकरता हक्क मागतोय महाराष्ट्र असंही पाटील यांनी गाण्याचा संदर्भ देत स्पष्ट केलं.
राष्ट्रवादीचा मुंबईत लाँग मार्च
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून बुधवारी एक लाँग मार्च काढण्यात येणार आहे. मंत्रालय जवळच्या गांधी पुतळ्यापासून लालबहादुर शास्त्री यांच्या पुतळ्यापर्यंत हा मार्च असेल. या मार्चच्या माध्यमातून महायुतीचे काळे कारनामे आम्ही दाखवणार आहोत, अशी माहिती जयंत पाटील यांनी गाणं लाँचिंग सोहळ्यानंतर पत्रकारांशी बोलताना दिली.
माझे शेतकरी बांधव, भगिनी, राज्यातील तरुण, सर्वसामान्य नागरिक प्रतीक्षा करत आहेत न्यायाची... त्यांच्या मूलभूत हक्कांची...
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) October 1, 2024
महाराष्ट्राच्या भल्यासाठी, स्वाभिमानीसाठी आम्ही एकसंघपणे हक्काने लढू!#हक्क_मागतोय_महाराष्ट्र https://t.co/Lyxu0EUAUM
अमित शाह यांच्या विधानावर पलटवार
अमित शाह यांनी 2029 साली भाजप पक्ष एकट्याने सत्ता स्थापन करेल, असे अमित शाह यांनी म्हटले होते. त्यावर, जयंत पाटील यांनी मिश्कील पलटवार केलाय. महाराष्ट्रात 2034 ला राष्ट्रवादीचं सरकार येईल, जेवढं हासू तुम्हाला आता आलं, तेवढं त्यांच्यावेळीदेखील आलं असावं. अमित शहा यांनी उद्यावर बोललं पाहिजे. इतर निवडणुका सोडून शहा महाराष्ट्रात येऊन थांबले आहेत. त्यांच्याकडे किती मोठा खड्डा पडलाय हे त्यांच्या येण्यावरून कळतंय, असे जयंत पाटील यांनी म्हटले. तसेच, राज्यात 2024 ला महाविकास आघाडीचे सरकार येईल, हे त्यांना माहितीय, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण