भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
आदिवासी समाजाच्या आमदार खासदारांच्या आंदोलनानंतर सरकारने कुठलेही घोषणा न केल्याने सरकार आदिवासी विरोधी भूमिका घेत असल्याचे ते म्हणाले.
नंदुरबार : राज्यातील महायुती सरकारने धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. धनगर आणि धनगड या दोन शब्दांवरुन सुरू असलेल्या जातीय संघर्ष आता निर्णयाच्या वळणावर पोहोचला आहे. धनगर समाजाला लवकरच एसटी प्रवर्गात सहभागी केलं जाईल, असे धनगर समाजाचे नेते उघडपणे सांगत आहेत. त्यामुळे, एसटी (ST) म्हणजे अनुसूचित जमाती प्रवर्गातील नेत्यांनी आपला विरोध दर्शवत सरकारविरुद्ध दंड थोपटले आहेत. त्यातच, भाजपमधील नेते आणि राज्याचे माजी मंत्री पद्माकर वळवी यांचा भाजपाच्या प्राथमिक सद्स्यत्वचा राजीनामा (Resigne) देत आपला विरोध स्पष्ट केला. राज्य सरकारने धनगर (Dhangar) आरक्षणासंदर्भात घेतलेल्या भूमिकेच्या निषेधार्थ आपण राजीनामा देत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आमदार नरहरी झिरवळ यांनीही या निर्णयाला विरोध करत सरकारविरुद्ध आंदोलन केले होते.
आदिवासी समाजाच्या आमदार खासदारांच्या आंदोलनानंतर सरकारने कुठलेही घोषणा न केल्याने सरकार आदिवासी विरोधी भूमिका घेत असल्याचे ते म्हणाले. तसेच, पद्माकार वळवी यांनी लवकरच नवीन भूमिका जाहीर करणार असून यापुढे आदिवासी समाजासाठी संघर्ष करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, पद्माकर वळवी यांनी राजीनामा दिल्यामुळे हा नंदूरबार जिल्ह्यात भाजपला हा धक्का मानला जातो. यापूर्वी माजी विधानसभा उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी देखील धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातून आरक्षण देण्याला आपला स्पष्ट विरोध दर्शविला आहे. राज्य सरकारने धनगर समाजाला अनुसूचित जमात या प्रवर्गातून आरक्षण देण्याचा शासन अध्यादेश (GR) काढला तर राज्यातील 60 ते 65 आमदार राजीनामा देतील, असा निर्वाणीचा इशाराही नरहरी झिरवाळ यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता.
आम्ही वेगळा निर्णय घेतल्यास जड जाईल - खोसकर
आदिवासी समाजाच्या आरक्षणाबाबत काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनीही आक्रमक भूमिका घेतली. राज्य सरकारने जर आज धनगर आरक्षणाचा जीआर काढला तर मी आमदारकीचा राजीनामा देणार आहे. राज्य सरकारच्या या चुकीच्या निर्णयामुळे आमची मुलं रस्त्यावर येतील. आमचा धनगर आरक्षणाला विरोध नाही. मात्र, आमच्यामध्ये त्यांना जर आणणार असाल तर आम्ही याला विरोध करणार आहोत. नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर प्रत्येक मतदारसंघात 60 ते 70 हजार आदिवासी मतं आहेत. सरकारसाठी आम्ही काही वेगळा निर्णय घेतला तर खूप जड जाईल. धनगर समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. जर आंदोलन करून निर्णय शकणार असेल तर आम्ही देखील रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन करू, असे खोसकर यांनी सांगितले. तर यावेळी हिरामण खोसकर यांना अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले होते.
हेही वाचा
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण