BLOG : असं काय आहे धर्मवीर 2 चित्रपटात? सत्तेचा सारीपाट आणि राजकारणाचं मैदान
मुंबई : धर्मवीर 2 या चित्रपटाच्या निर्मात्या आणि दिग्दर्शकाच्या शब्दांमध्ये सांगायचं तर ही साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट आहे. साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हेच चित्रपटाचं धर्मवीर 2 चित्रपटाचं उपनाव आणि त्याचा गाभाही आहे. एक पत्रकार या नात्यानं ठाकरे या चित्रपटानंतर धर्मवीर टू चित्रपटाचाही मी फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिला. या चित्रपटाच्या उपनावात असलेल्या साहेब या बिरुदावलीत आनंद दिघे आणि त्यांचे राजकीय पट्टशिष्य एकनाथ शिंदेही अभिप्रेत असावेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या बंडामागची कारणं आणि त्यांच्या आमदारांच्या त्याआधीच्या अस्वस्थतेमागची कारणं लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. अर्थात ती नाण्याची एकच बाजू आहे.
एकनाथ शिंदे म्हणजे आनंद दिघेंचं प्रतिबिंब किंवा वारसदार असल्याचं ठसवण्याचाही प्रयत्न चित्रपटातून करण्यात आला आहे. त्यासाठी मविआ सरकारच्या काळातल्या घटना आणि दिघेंच्या आयुष्यातल्या घटना यांची सांगड घालून हा चित्रपट पुढे सरकतो. उद्धव ठाकरे यांनी मविआत सहभागी होताना हिंदुत्वाला सोडचिठ्ठी किंवा तिलांजली दिली असा आरोप शिंदे गटाकडून बंडाच्या समर्थनासाठी करण्यात येतो. तोच अधोरेखित करण्यासाठी आनंद दिघेंच्या आयुष्यातल्या नाट्यमय घटनांचा आणि मविआ सरकारच्या काळातल्या घटनांचा वापर करून त्यावर चित्रपटात भाष्य करण्यात आलं आहे.
आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांच्यासह संजय शिरसाट, दादा भुसे, भरत गोगावले, शहाजीबापू पाटील, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, शंभूराज देसाई यांच्याही व्यक्तिरेखा आपल्याला चित्रपटाच्या पडद्यावर दिसतात. शिंदे गटाची मविआ सरकारच्या काळातली राजकीय अस्वस्थता ते मांडतात. संपूर्ण चित्रपटात उद्धव ठाकरे किंवा संजय राऊतांची व्यक्तिरेखा दिसत नाही. पण राऊतांचा प्रवक्ते म्हणून होणारा उल्लेख आणि उद्धव ठाकरेंचा नाव न घेता प्रसंगाला साजेसा होणारा उल्लेख हा त्यांचं अस्तित्व कथेतलं जाणवून देतो. ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकरांची व्यक्तिरेखा चित्रपटाच्या पडद्यावर न दिसणाऱ्या साहेबांची बाजू सांभाळण्यासाठी तारेवरची कसरत करताना दिसते.
धर्मवीर 2 या चित्रपटातील काही नाट्यमय संवाद
शिंदे (सुरतच्या दिशेनं जाताना. एका पत्रकाराला उद्देशून) - अडीच वर्षे वाट भरकटलेला विक्रम आज योग्य दिशेनं चाललाय.
शिंदें (अखेरच्या प्रसंगात दिघेंसोबतच्या काल्पनिक संवादात) - राज ठाकरेंसारखा उमदा वारसदार पक्षातून गेला तेव्हा का नाही बोललात?
दिघे (अखेरच्या प्रसंगात शिंदेंना उद्देशून) - संघटनेला एकटा पाडून पुढे जाऊ नकोस. या खांद्यावर हिंदुत्व आणि या खांद्यावर संघटना घेऊन पुढे जा.
जा जा एकनाथ जा. अयोध्येतलं राममंदिर उभं राहण्याआधी या महाराष्ट्रातलं हिंदुत्व उभं कर.
शिंदें (अखेरच्या प्रसंगात दिघेंसोबतच्या काल्पनिक संवादात) - तुम्ही गेलात. पाठोपाठ बाळासाहेब गेले. हिंदुत्व अनाथ झालं. संघटना वाचवा साहेब.
मी मेल्यावर 20 वर्षांनी संघटना वाचवायला हवा असेन तर तुम्ही काय उखडायला जिवंत आहात?
दिघे (अखेरच्या प्रसंगात शिंदेंना उद्देशून) - मी मेल्यावर 20 वर्षांनी संघटना वाचवायला हवा असेन तर तुम्ही काय उखडायला जिवंत आहात?
दिघे - जेव्हा जेव्हा महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेशील तेव्हा तेव्हा कुणाचा तरी नुकसान होईल आणि तुझ्या सुपाऱ्या निघतील.
अनाथांचा एकनाथ हो, दीनदुबळ्यांचा लोकनाथ हो.
पालघरमधली साधूंची हत्या, अयोध्येतलं आंदोलन, मलंगगडाचं आंदोलन, दिघेंना रासुकान्वये झालेली पहिली अटक, दहावीसाठीची सराव परीक्षा, सावरकरांचा अपमान, दिघे/कमिशनर त्यागी संघर्ष, नथुराम आणि शरद पोंक्षे, गडचिरोली विकासकामं आणि शिंदेंच्या सिक्युरिटीचा मुद्दा, शिंदेंची कोरोना काळातली कामं, राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणूक आदी काळातल्या घटनांना घेऊन चित्रपट पुढे सरकतो. त्यातून एकनाथ शिंदे हे आनंद दिघेंचं प्रतिबिंब किंवा वारसदार असल्याचं ठसवण्याचा चित्रपटात ठाशीव प्रयत्न असल्याचं दिसतंय.
एक प्रेक्षक म्हणून हा चित्रपट प्रत्येकाला भावेल का हा प्रश्न आहे. पण आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचं उद्दिष्ट ठेवून हा चित्रपट बनवल्यानं त्याचा राजकीय परिणाम किती होईल, हीच माझ्यातल्या पत्रकारासाठी उत्सुकता आहे.