'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
आरोपी सुनीलनं केलेला हा प्रकार नरभक्षणाचा आहे. केवळ दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून रागाच्या भरात सुनीलनं आपली जन्मदाती 63 वर्षीय आई यल्लमा कुचिकोरवी हिच हत्या केली

मुंबई : दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून आपल्या आईची अतिशय निर्घृणपणे हत्या करून तिच्या शरीराचे अक्षरश: लचके तोडणाऱ्या नराधम मुलाची फाशी हायकोर्टानं कायम केलीय. या आमानवी आणि अघोरी प्रकारासाठी सुनील कुचिकोरवी या आरोपीला सुनावलेली फाशीची शिक्षा योग्यच असून तो सुधारण्याची कोणतीही शक्यता नसल्यानं तो समाजात राहण्यास योग्य नाही, असं स्पष्ट मत मुंबई उच्च न्यायालयानं (Highcourt) आपल्या निकालात नोंदवलंय. कोल्हापूरमध्ये साल 2017 मध्ये घडलेली ही घटना दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचं नमूद करत न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठानं कोल्हापूर (Kolhapur) सत्र न्यायालयानं साल 2021 मध्ये दिलेला निकाल कायम ठेवत आरोपीला सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तबत केलं. या निकालाला आरोपीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता यावं यासाठी 30 दिवसांचा अवधी देण्यात आला आहे.
आरोपी सुनीलनं केलेला हा प्रकार नरभक्षणाचा आहे. केवळ दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून रागाच्या भरात सुनीलनं आपली जन्मदाती 63 वर्षीय आई यल्लमा कुचिकोरवी हिच हत्या केली. त्यानंतर त्यानं आईचं मांस खाण्यास सुरूवात केली. मेंदू, -हदय, यकृत, आतडं, मुत्रपिंड आणि बरगड्याही शिजवून खाण्याचा त्याचा इरादा होता. कोल्हापुरातल्या माकडावाला परिसरात 28 ऑगस्ट 2017 ला ही भयंकर घटना घडली होती. या घटनेनं कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्र हादरला होता. चक्क जन्मदात्या आईची अशी निुर्घरपणे हत्या केल्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत होता. याप्रकरणी, कोल्हापूर सत्र न्यायालयाने 2021 मध्ये आरोपी मुलाला फाशीची शिक्षा सुनावली होती. आता, मुंबई उच्च न्यायालयानेही ही शिक्षा कायम ठेवत समाजाला महत्त्वाचा संदेश दिला आहे.
काय आहे प्रकरण
आरोपी सुनील कोंचीकोरवी याची आई फुगे आणि विकून आपला उदरनिर्वाह करतत होती. तिला राजू आणि सुनील अशी दोन मुलं होती. त्यात सुनील हा लहान मुलगा होता, ज्याला दारुचं व्यसन होतं. घटनेच्या दिवशी आई रात्री 10 वाजता घरी आली, तेव्हा सुनीलनं तिच्याकडे पैशांची मागणी केली. आईनं नकार दिल्यानंतर दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. यावेळी आरोपी सुनील याने आपल्या आईवर चाकूनं हल्ला केला. यानंतर त्याने तिच्या शरीराचे तुकडे करण्यास सुरूवात केली. या घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या लोकांनी या घटनेची पोलिसांना माहिती दिली. या घटनेची दखल घेत पोलीसंनी घटनास्थळी पोहोचून आरोपीला अटक केली. या खटल्यात शेजाऱ्यांसह 12 जणांची साक्ष नोंदवण्यात आली होती.























