(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune DSK Bail News: मोठी बातमी! बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णींना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांना आणखी एका केसमधे सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
Pune DSK Bail News : बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांना आणखी एका केसमधे सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र डी. एस. के आणि त्यांच्या पत्नींवर दाखल आणखी चार गुन्ह्यात खटले सुरु असल्याने डी. एस. के. पती- पत्नींना तुरुंगातच रहावं लागणार आहे. आज सर्वोच्च न्यायालयाने डी एस कुलकर्णी यांना त्यांच्यावर दाखल मुख्य गुन्ह्यात जामीन मंजूर केल्याने डी. एस. कुलकर्णी तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
डी. एस. कें.वर सुरु असलेल्या चार खटल्यांमधे देखील त्यांना जामीन मंजूर झाला तर ते तुरुंगातून बाहेर येऊ शकतात. गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याबद्दल डी. एस. के. आणि त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्यावर 28 मे 2017 रोजी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यानंतर डी एस के आणि त्यांच्या पत्नीवर इतरही अनेक गुन्हे दाखल झाले. मात्र शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा हा हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याबद्दल दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यात डी एस के आणि त्यांच्या पत्नी हेमंती यांना फेब्रुवारी 2018 मधे अटक करण्यात आली होती. मात्र आज राज्य सरकारचे वकील राहूल चिटणीस हे डी एस कुलकर्णींच्या जामीनाला विरोध करण्यासाठी आवश्यक ती कारणे देण्यास कमी पडले असं निरिक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे.
काय होतं प्रकरण?
लोकांना जास्त पैशाचं आमिष दाखवून पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डीएसके यांनी हजारो गुंतवणूकदारांना 2 हजार 43 कोटींना फसवल्याचा त्यांच्यावर आरोप होता. याप्रकरणी त्यांची पत्नी हेमंती, मुलगा शिरीष, भाऊ मकरंद, पुतणी, जावई यांच्या विरोधातही फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी जामीन मिळावा म्हणून डीएसके आणि त्यांच्या पत्नी हेमंती यांनी अॅड आशुतोष श्रीवास्तव आणि अॅड रितेश येवलेकर यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर युक्तिवाद पूर्ण झाल्याने न्यायालयानं आपला अंतिम निकाल राखून ठेवला होता. जो जाहीर करताना हायकोर्टानं डीएसकेंना कोणताही दिलासा न देता त्यांची याचिका फेटाळून लावली होती.