Sanjay Raut on Rajya Sabha Election 2026: 'जर पवार साहेब निवडणुकीला उभे राहिले नसते तर...', संजय राऊतांचं राज्यसभा निवडणुकीबाबत भाष्य, तिढा कसा सोडवला?
Sanjay Raut on Rajya Sabha Election 2026: राज्यसभेच्या जागेबाबत आणि सर्व घडामोडीबाबत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

मुंबई : महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे एकमत झाले असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) हे पुन्हा राज्यसभेवर जाणार असल्याचे चित्र काल (बुधवारी, ता ४) स्पष्ट झाले आहे. राज्यातील राज्यसभेच्या सातही जागांची निवडणूक बिनविरोध होणार हेही निश्चित झाले आहे. काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना या दोन्ही मित्र पक्षांनी शरद पवार (Sharad pawar) यांच्या राज्यसभा उमेदवारीला पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्यामुळे तसेच भाजपने पाचवा उमेदवार न दिल्याने सात जागांसाठी प्रमुख सात उमेदवार रिंगणात असतील. त्यामुळे वयाच्या ८५ व्या वर्षी पुन्हा राज्यसभेवर जाणार आहेत. या निमित्ताने साठ वर्षाच्या त्यांच्या सांसदीय कारकिर्दीला आणखी सहा वर्षाची जोड मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. अशातच राज्यसभेच्या जागेबाबत आणि सर्व घडामोडीबाबत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
सगळ्यांनी मिळून शरद पवार यांनी राज्यसभेत जावं यासाठी हा निर्णय घेतला
महाविकास आघाडीकडून राज्यसभा उमेदवार शरद पवार असतील याबाबत बोलताना राऊत (Sanjay Raut) म्हणाले, आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आणि महाराष्ट्रातून विरोधी पक्षाला एकच जागा मिळते आणि ती सुद्धा आम्ही एकत्र राहिलो तर आणि काल सर्वानुमते ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावावरती सगळ्यांनी सहमती दर्शवली. आदित्य ठाकरे सातत्याने सांगत होते हे खरं आहे, सर्वाधिक मोठा पक्ष शिवसेना आणि त्याच्यामुळे ही जागा शिवसेनेने लढवायला पाहिजे, ही भूमिका योग्य होती. त्यानंतर काँग्रेस पक्ष आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दहा लोक आहेत, तरीही आम्ही ही जागा शरद पवार यांच्यासाठी सोडली, सगळ्यांनी मिळून शरद पवार यांनी राज्यसभेत जावं यासाठी हा निर्णय घेतला. चर्चा झाली, उद्धवजी बरोबर काँग्रेसच्या नेत्यांबरोबर शरद पवारांचे जे राजकारणातल्या आणि समाजकारणातलं स्थान आहे आणि त्यांच्या नेतृत्व आहे, त्याच्यामुळे ही जागा आम्ही सन्माननीय शरद पवार यांच्यासाठी तिघांनी मिळून जाहीर केली आहे. आमचं जेवढी संख्या लागते जिंकण्यासाठी आमदारांची तेवढी आमच्याकडे आहे आणि भविष्यामध्ये महाविकास आघाडी येणाऱ्या अशा प्रकारच्या निवडणुका राज्यसभा विधान परिषद यासाठी काय निर्णय घ्यायचे आणि कोणी कोणती निवडणूक लढायची यासाठी आम्ही लवकरच तीन पक्ष एकत्र बसण्याचे ठरले आहे, शेवटी तिन्ही पक्षाचा आप-आपला वाटा आहे, असंही पुढे राऊत यांनी म्हटलं आहे.
सत्तेच्या मागे आता धावू नये
काल जयंतराव पाटील यांनी त्यांच्या पक्षातर्फे भूमिका स्पष्ट केली, मुळात माझे मत पहिल्यापासून होते, अजितदादा असल्यापासून हे विलीनीकरण या दंतकथा आहे, त्यातून काही निष्पन्न होणार नाही आणि होण्याची शक्यता दिसत नाही पण काही लोकांना वाटत असेल पण ही दंत कथा होती, ती आता संपली आहे. आम्हाला सगळ्याला यापुढे महाविकास आघाडी म्हणून काम करावे लागेल आणि आमची ते मानसिकता आहे, सत्ता येते, सत्ता जाते, आम्हाला जनतेने विरोधी पक्षांमध्ये जबाबदारी दिली आहे, ती योग्य पद्धतीने पार पडली पाहिजे, महाराष्ट्रात आणि देशात सगळे सरकार भाजपचे अपयशी ठरले आहेत, प्रश्नांचा डोंगर आहे, अशा वेळेला जनतेचा आवाज म्हणून विरोधी पक्षाला काम करावे लागेल, जे विरोधी पक्षात आहेत, त्यांनी सत्तेच्या मागे आता धावू नये, येणाऱ्या पुढल्या निवडणुकांची तयारी करावी आणि लोकांपर्यंत पोहोचावं हे आमच्या सगळ्यांचे मत आहे अशी भावना संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.
प्रियंका चतुर्वेदींची राज्यसभेवरीत संधी हुकली
प्रियांका चतुर्वेदी या राज्यसभेमध्ये उत्तम काम करत होत्या. पण गणित जमत नसल्यामुळे त्यांना दुर्दैवाने राज्यसभेच्या बाहेर बसावं लागलं. जर गणित जमलं असतं जर पवार साहेब निवडणुकीला उभे राहिले नसते तर ही जागा शिवसेना शंभर टक्के लढून विद्यमान राज्यसभा सदस्य चतुर्वेदी यांना ती जागा द्यायला कोणाचीच अडचण नव्हती, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी पक्षांमध्ये सगळ्यांची इच्छा होती जागा शिवसेनेने लढावावी, मात्र पवार साहेबांसारखा नेता उभा राहतो आणि सगळ्यांचे ठरत आहे, त्यांना पाठिंबा दिला पाहिजे आणि तेवढा आकडा शिवसेनाकडे किंवा अन्य कोणत्याही पक्षाकडे नाही हे सत्य आहे, असंही राऊत म्हणालेत.
शरद पवारांच्या उमेदवारी अर्जाबाबत राऊत म्हणाले...
माननीय शरद पवार हे कालच हॉस्पिटल मधून घरी आले आहेत आणि त्यांच्यावरती अजूनही काही प्रमाणामध्ये उपचार सुरू आहेत ते लवकरच बरे होतील आणि त्यांना जशी माझ्यावरती वेळ होती, गर्दीमध्ये जाऊ नये तशी बंधन होती, डॉक्टरांनी मला सुद्धा अजून काही नियम सांगितले आहेत. शेवटी वयामध्ये फरक आहे, त्यांनाही ती बंधन आहेत. फार गर्दीमध्ये त्यांनी सध्या जाऊ नये त्याच्यामुळे इतर काही कायदेशीर आणि तांत्रिक प्रक्रिया आहेत, त्या त्यांच्या निवासस्थानी सिल्वर ओक वर पूर्ण केल्या जातील आणि त्यानंतर उमेदवारी अर्ज हा आम्ही सगळे मिळून विधानभवनात निवडणूक कार्यालयात राज्यसभेच्या आम्ही देऊ.





















