Sagar Moholkar: जेलमध्ये एकाला संपवलं, सगळ्यांदेखत निलेश घायवळच्या कानाखाली मारली, अहिल्यानगरमध्ये गोळीबारात जखमी सागर मोहोळकर कोण?
Sagar Moholkar: पुण्यामधील गुंड निलेश घायवळवर भर कुस्तीच्या मैदानात कानशिलात लगावणाऱ्या कुख्यात गुंड आणि पैलवात सागर मोहळकर याच्यावर अहिल्यानगरमध्ये गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे.

जामखेड : पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या टोळीची जिल्हाभर दहशत असताना, त्याला भर कुस्तीच्या मैदानात कानशिलात लगावणारा पैलवान व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला सागर मोहोळकर (Sagar Moholkar) याच्यावर अज्ञातांकडून गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात सागर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचारांसाठी सागर मोहोळकरला (Sagar Moholkar) पुण्यातील रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात हल्लेखोरांनी सागरवर जवळून गोळीबार केला. त्याच्या डोक्याच्या दिशेने गोळी झाडण्यात आली होती; मात्र तो थोडक्यात बचावल्याचे सांगितले जात आहे. गोळी लागून तो जखमी झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी सागरला रुग्णालयात दाखल केले.(Sagar Moholkar)
गोळीबारानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. पोलिसांनी परिसराची नाकाबंदी करून शोधमोहीम सुरू केली आहे. घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्यात आले असून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. या हल्ल्यामागे वैयक्तिक वैर, गँगवॉर की इतर कोणते कारण आहे, याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. संशयितांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. या घटनेमुळे जामखेड तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.(Sagar Moholkar)
who is Sagar Moholkar : सागर मोहोळकर कोण?
सागर मोहोळकर हा पैलवान म्हणून ओळखला जात असला, तरी त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल असल्याची नोंद आहे. काही वर्षांपूर्वी एका खून प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती आणि तो कारागृहातही होता. तुरुंगवास भोगल्यानंतर तो जामिनावर बाहेर आला. कारागृहात असतानाही त्याच्याविरोधात आणखी एका गंभीर गुन्ह्याची नोंद झाल्याची चर्चा आहे.
दरम्यान, एप्रिल २०२५ मध्ये धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील आंदरूड येथे जत्रेदरम्यान आयोजित कुस्ती स्पर्धेत सागरने भर मैदानात निलेश घायवळच्या कानाखाली लगावल्याची घटना मोठ्या प्रमाणावर चर्चेत आली होती. गावात दोन वेगवेगळे कुस्ती फड सुरू होते. त्यावेळी सागरने कुस्ती लावण्याची मागणी पंचांकडे केली होती; मात्र आधीच नियोजित कुस्त्यांमुळे त्याची मागणी फेटाळण्यात आली. त्या वेळी मैदानात उपस्थित असलेल्या निलेश घायवळशी वाद निर्माण झाला आणि सागरने आखाड्यात घुसून त्याला कानशिलात मारली होती. या पार्श्वभूमीवर झालेला ताजा गोळीबार हा पूर्वीच्या वादाशी संबंधित आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. शहरात तणावाचे
सागर मोहोळकरचा भयंकर इतिहास समोर
जेव्हा निलेश घायवळला कानाखाली लगावली होती तेव्हा त्या घटनेचा वाशी पोलिसांनी गुन्हा दाखल करत सागर मोहोळकरला ताब्यात घेतलं होतं. वाशी पोलीसांकडून त्यांची कसून चौकशी केली होती. पोलीस तपासात सागर मोहोळकरचा भयंकर इतिहास समोर आला आहे. तो कुस्तीच्या फडासह गुन्हेगारी क्षेत्राचा पक्का खिलाडी असल्याचं पोलीस तपासातून समोर आलं आहे. कारण त्याच्यावर याआधी खुनाचे दोन गुन्हे दाखल असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. काही वर्षांपूर्वी सागर मोहोळकरला एका खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात केलेली होती. त्याला तुरुंगवास देखील झाला होता. खुनाच्या गुन्ह्यात तुरुंगात असताना सागरने तुरुंगात आणखी एकाचा खून केल्याची माहिती समोर आली आहे.





















