सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून अंतिम वर्षाची परीक्षा घेण्याची तयारी सुरु
अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. मात्र परीक्षेसंदर्भात कायद्यानुसार निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका राज्यपालांनी घेतली. त्यातच आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अंतिम वर्षाची परीक्षा घेण्याची तयारी सुरु केली आहे.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून अंतिम वर्षाची परीक्षा घेण्याची तयारी सुरुच आहे. याबाबत माहिती देताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. एन. एस. उमराणी म्हणाले की, "8 मेच्या राज्य शासनाच्या आदेशामध्ये अंतिम वर्ष वगळता बाकी वर्षांची परीक्षा होणार नाही असं नमूद केलं होतं. यानंतर अजून कोणताही नवीन आदेश शासनाकडून आलेला नाही. त्यामुळे 8 मेचं सर्क्यूलर हेच विद्यापीठासाठी बंधनकारक आहे. या सर्क्यूलरमध्ये नमूद केल्याप्रमाणे अंतिम वर्षाची परीक्षा घेण्याची तयारी विद्यापीठाकडून सुरु आहे."
फक्त अंतिम वर्षाची परीक्षा होणार असा शासनाने आदेश काढल्यानंतर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात अंतिम वर्षाचीही परीक्षा होणार नाही असं सांगितलं होतं. यावर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आक्षेप घेतला. यानंतर अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करण्याच्या संदर्भात कोणताही अधिकृत जीआर शासनाकडून काढण्यात आलेला नाही, असं विद्यापीठाचं म्हणणं आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अंतिम वर्षासाठी जवळपास 2 लाख 46 हजार विद्यार्थी प्रविष्ट आहेत. ही परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठाला विविध कोर्सेसच्या एकूण दोन हजार प्रश्नपत्रिका सेट कराव्या लागणार आहेत. विद्यापीठाकडून पारंपरिक पद्धतीची लेखी परीक्षा घेतली जाईल. यामध्ये दीड तासाची 50 किंवा 40 गुणांची प्रश्नपत्रिका असेल.
मुख्यमंत्री काय म्हणाले होते? कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे बऱ्याच परीक्षा रद्द झाल्या. परंतु अंतिम वर्षांच्य परीक्षेबाबत संभ्रम कायम असल्याने विद्यार्थी चिंतेत होते. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 31 मे रोजी राज्याच्या जनतेशी संवाद साधताना अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यात येत असल्याचं जाहीर केलं. आजवरच्या सेमिस्टरच्या मूल्यांकनावरुन पदवीचा निकाल लावणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
राज्यपालांची भूमिका मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर कायद्यानुसार परीक्षांचा निर्णय होणार अशी राज्यपालांनी भूमिका घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार निर्णय घेण्यात येईल असे कळवलं. त्यामुळे राज्य सरकारने घेतलेला अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भातील निर्णय अधांतरीच आहे.
संबंधित बातम्या