(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune News : खऱ्या प्रेमाचा दुर्दैवी शेवट! गर्भवती पत्नीच्या अपघाती मृत्यूनंतर पतीची आत्महत्या, जुन्नरमधील दुःखद घटना
गर्भवती पत्नीच्या अपघाती मृत्यूनंतर पतीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गर्भवती पत्नीचा डोळ्यादेखत अपघाती मृत्यू झाला.
Pune Crime News : गर्भवती पत्नीच्या अपघाती (Pune Crime) मृत्यूनंतर पतीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गर्भवती पत्नीचा डोळ्यादेखत (Pune) अपघाती मृत्यू झाला. त्यानंतर या घटनेचा पतीला धक्का बसला आणि त्याने देखील मानसिक धक्क्यातून आत्महत्या केली. पुण्याच्या जुन्नरमध्ये (Junnar) ही दुःखद घटना घडली. रमेश कानसकर असं 29 वर्षीय पतीचं तर विद्या कानसकर असं पत्नीचं नाव होतं. याच वर्षी त्यांचा प्रेमविवाह झाला होता, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 नोव्हेंबरचा दिवस होता. रमेश, गर्भवती पत्नी विद्या आणि सासू असे तिघे खरेदीसाठी बाहेर पडले होते. नारायणगाव येथील सोनाराच्या दुकानातील खरेदी उरकून हे तिघे घरी परतत होते. तेव्हा एक मोठा गतिरोधक लागला. पत्नी गर्भवती असल्याने ती दुचाकीवरुन खाली उतरली. मात्र त्याचवेळी ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीची धडक विद्याला लागली आणि त्याच ट्रॉलीचं चाक तिच्या शरीरावरुन गेलं. त्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत ती मार्गावर पडून होती. पती रमेश तिला वाचवण्यासाठी आकांताने प्रयत्न करत होता. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
डोळ्यादेखत घडलेला अपघात आणि त्यात मृत्यू पावलेली पत्नी गर्भवती असल्याने रमेशला मोठा धक्का बसला होता. हे सगळं माझ्यामुळेच झालं, माझ्या पत्नीच्या मृत्युला मीच जबाबदार आहे. या विचारात तो स्वतःला त्रास करुन घेत होता. हा मानसिक ताण त्याला अस्वस्थ करत होता. यातूनच 16 नोव्हेंबरच्या रात्री त्याने विषारी औषध प्राशन केलं. पहाटेच्या सुमारास त्याची तब्येत खालावली. कुटुंबीयांनी रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. पत्नीच्या मृत्यूनंतर दुर्दैवाने त्याचाही मृत्यू झाला. या घडलेल्या घटनेमुळे कानसकर कुटुंबियांमध्ये दु:खाचा डोंगर पसरला आहे. या घटनेमुळे जुन्नरमध्ये खळबळ उडाली आहे. दोघांच्याही अचानक जाण्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.
रमेश अन् विद्याचा प्रेमविवाह झाला होता
रमेश आणि विद्याने याच वर्षी प्रेमविवाह केला होता. गुण्यागोविंदाने त्यांचा संसार सुरु होता. पुढच्या काही दिवसांत एका गोंडस बाळाचं घरात आगमन होणार होतं. त्या बाळाची चाहूल दोघांसोबतच कानसकर कुटुंबियांना लागली होती. बाळाच्या आगमनासाठी कुटुंबीय आतुर होते. बाळाच्या येण्याच्या तयारीला सगळे लागले होते. मात्र बालदिनीच या सुखी कुटुंबावर काळाने घाला घातला आणि संसार उद्धवस्त झालं.