Pune MPSC Protest : 'या' मागणीसाठी MPSC चे विद्यार्थी पून्हा रस्त्यावर उतरणार; पुण्यात उद्या राज्यव्यापी आंदोलन
MPSC तांत्रिक विभाग परीक्षा पॅटर्न 2025 पासून लागू करावा या मागणीसाठी उद्यापासून विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर उतरणार आहेत.
Pune MPSC Protest : राज्य सेवा परीक्षेचा नवा अभ्यासक्रम 2025 (MPSC) पासून लागू करावा या मागणीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. ती मागणी नुकतीच मान्य करण्यात आली आहे. मात्र पुण्यात पुन्हा एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले आहे. MPSC तांत्रिक विभाग परीक्षा पॅटर्न 2025 पासून लागू करावा या मागणीसाठी उद्यापासून विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर उतरणार आहेत. राज्यभरातील विद्यार्थी उद्या पुण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
हे विद्यार्थी उद्या पुण्यातील बालगंधर्व चौकात उपोषणाला बसणार आहेत. प्रशासन त्यांना जाणीवपूर्वक त्रास देत असून मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा इशारा विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि सरकारला दिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पुन्हा आंदोलनाला बसणार असल्याचं सांगितलं आहे.
राज्य भरातून विद्यार्थी पुण्यात
आतापर्यंत या विद्यार्थ्यांनी अनेक आंदोलनं केली आहे. परिक्षेचा नवा पॅटर्न 2025 पासून लागू करा या मागणीसाठी शेकडो विद्यार्थी काहीच दिवसांपूर्वी सलग तीन दिवस रस्त्यावर उतरली होती. त्यावेळी अनेक नेत्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवारांनीदेखील रात्री उशीरा य़ा विद्यार्थ्य़ांची भेट घेतली होती. मागील अनेक वर्षांपासून पुण्यात किंवा राज्यभर विद्यार्थी राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास करत आहेत. दोन वर्ष कोरोना (Corona) असल्याने या विद्यार्थ्यांना काही प्रमाणात त्रास सहन करावा लागला होता. त्यानंतर परीक्षांच्या तारखा देखील लवकर जाहीर झाल्या नाहीत. या सगळ्यांमुळे विद्यार्थी संतापले होते. त्यानंतर नवा पॅटर्न लागू करणार असल्याने विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. पॅटर्न (New MPSC Pattern 2025) लागू करण्याची घाई झाली तर विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. याबाबत सरकारने विचार करावा, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केलं होतं. उद्या राज्यभरातून विद्यार्थी आंदोलनासाठी पुण्यात दाखल होणार आहेत.
त्यानंतर याविद्यार्थांची मागणी मान्य करण्यात आली होती. नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आता MPSC तांत्रिक विभाग परीक्षा पॅटर्न 2025 पासून लागू करावा या मागणीसाठी विद्यार्थी रस्त्य़ावर उतरणार आहेत. जोपर्यंत ही मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे. या आंदोलनाला विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येत आहे. आंदोलन स्थळी पोलिसांंचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.