(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Leopard : एक पाय निकामी असलेल्या बिबटा कुत्र्यासोबत भिडला अन्....! थरारक व्हिडीओ समोर
आयटी सिटी अशी ओळख असलेल्या हिंजवडीलगत एक पाय निकामी असलेल्या बिबट्याने शिकार केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. मध्यरात्री बिबट्याने नेरे गावातील बंगल्यासमोर पाळीव कुत्र्याची शिकार केली आहे.
Pune Leopard : आयटी सिटी अशी ओळख असलेल्या हिंजवडीलगत एक पाय निकामी असलेल्या बिबट्याने शिकार केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. मध्यरात्री बिबट्याने नेरे गावातील बंगल्यासमोर पाळीव कुत्र्याची शिकार केली. साखळीला बांधून ठेवलेल्या या कुत्र्यावर जखमी बिबट्याने हल्ला केला आणि साखळी तोडून कुत्र्याला घेऊन पसार झाला. हा थरारक हल्ला सीसीटीव्हीत कैद झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या मनात धडकी भरत आहे.
बिबट्याचा मागील तीन वर्षांपासून अधिक काळ नेरे, जांबे आणि कासारसाई भागामध्ये खुलेआम वावर असल्याने या भागामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे. वन विभागाने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी या भागातील स्थानिक नागरिक करत आहे. मात्र वनविभाग सातत्याने स्थानिक नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याने बिबट्याची दहशत या भागात अजूनही पाहायला मिळत आहे. नागरिकांनी या संदर्भात वारंवार तक्रारी केल्या आहेत शिवाय अनेकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
बिबटाचा मोकळा वावर असलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र हाच व्हिडीओ पाहून अनेकांच्या मनात धडकीदेखील भरताना दिसत आहे. बिबट्यांच्या अशा मोकळ्या वावरामुळे शेतकऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण आहे. त्यातच हा व्हिडीओ समोर आल्याने भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
Pune Leopard : एक पाय निकामी असलेल्या बिबटा कुत्र्यावर भिडला अन्....! थरारक व्हिडीओ समोर pic.twitter.com/l2kgakG8tO
— Shivani Pandhare (@shivanipandhar1) March 16, 2023
चाकणमध्येही केला होता बिबट्याने शिरकाव
मागील महिन्यात पुण्यातील चाकण एमआयडीसीमध्ये पहाटे बिबट्या आढळला होता. हा बिबट्या मर्सडिज बेन्ज या आंतरराष्ट्रीय कंपनीत घुसल्याचं कंपनीमधील एका चालकाच्या निदर्शनास आलं होतं. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाऊन बिबट्या असल्याची खात्री करून घेतली. तसेच त्यांनी याबाबत वनविभागाला कळवलं होतं. जवळपास सात तासांच्या थरारानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलं. कंपनीच्या बॉडी शॉप सेक्शनमधील कामगारांना खबरदारी म्हणून बाहेर काढण्यात आलं होतं. चाकण एमआयडीसीत अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या असल्याने, या एमआयडीसीची आंतरराष्ट्रीय पातळीवर एक वेगळी ओळख आहे. याच एमआयडीसीमधील मर्सडिज बेन्ज या आंतरराष्ट्रीय कंपनीत आज बिबट्याने शिरकाव केला होता. यामुळं एमआयडीसीसह आसपासच्या परिसरात खळबळ उडाली होती. कंपनी साधारण शंभर एकरमध्ये विस्तारल्यानं बिबट्याला जेरबंद करण्याचं मोठं आव्हान वनविभागासमोर होतं. मदतीला पिंपरी चिंचवड पोलीस ही दाखल झाले होते.