MPSC : टायपिंग स्किल टेस्ट संदर्भात पुण्यात झालेल्या आंदोलनानंतर MPSC कडून प्रसिद्धीपत्रक
MPSC : पुण्यात (Pune) MPSC च्या विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे.

MPSC : टायपिंग स्किल टेस्ट संदर्भात पुण्यात (Pune) विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं 23 मार्चच्या परिपत्रकानुसार महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2021 मधील लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्यक या संवर्गासाठी टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी मॉक लिंक उपलब्ध करुन दिली आहे. त्या मॉक लिंकमध्ये मराठी टंकलेखनाच्या कीबोर्डबाबत काही उमेदवारांचा संभ्रम निर्माण झाला आहे. सदर मॉक लिंक टेस्टमधील मराठी टंकलेखनाचा कीबोर्ड हा केवळ उमेदवारांना टंकलेखन कौशल्य चाचणीची कार्यपद्धती आणि स्वरूप अवगत व्हावे, यासाठी अतिरिक्त सुविधेच्या स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आला असल्याचं स्पष्टीकरण MPSC कडून देण्यात आलं आहे.
MPSC पत्रकात नेमकं काय?
उमेदवारांनी संगणकीय प्रणालीवर आधारित मराठी टंकलेखन चाचणीचा सराव हा 'आयएसएम वी 6' प्रणालीवरी 'मराठी कीबोर्ड लेआउट' वरच करावा. कारण प्रत्यक्ष टंकलेखन चाचणीसाठी उमेदवारांना 'मराठी कीबोर्ड लेआऊट' हाच पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं MPSC प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. दरम्यान, या परीक्षेसाठी मराठी टंकलेखन अमागास उमेदवारांसाठी 300 शब्दांपैकी किमान 279 किंवा त्यापेक्षा जास्त अचूक शब्द टंकलिखित करणे गरजेचे आहे. तर अमागास वगळता इतर सर्व पात्र आरक्षित उमेदवारांसाठी 300 शब्दांपैकी किमान 270 किंवा त्यापेक्षा जास्त अचूक शब्द टंकलिखित करणे अपेक्षित आहे. तर इंग्रजी टंकलेखनासाठी अमागास उमेदवारांना 400 शब्दांपैकी किमान 372 किंवा त्यापेक्षा जास्त अचूक शब्द टंकलेखित करणे गरजेचे आहे. तर अमागास वगळता इतर सर्व पात्र आरक्षण उमेदवारांसाठी 400 शब्दांपैकी किमान 360 किंवा त्यापेक्षा जास्त अचूक शब्द टंकलिखित करणे अपेक्षित असल्याचं MPSC ने म्हटलं आहे.
पुण्यात विद्यार्थ्यांचं आंदोलन
पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा आंदोलन सुरु केलं आहे. लिपिक टंकलेखक आणि कर सहायक्क परीक्षेच्या टायपिंग स्किल टेस्टमध्ये आयोगानं केलेल्या बदलामुळं विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. पुण्यातील बालगंधर्व चौकात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं हे आंदोलन सुरु झालं आहे.
लिपिक टंकलेखक आणि कर सहायक्क कौशल्य चाचणीबाबत MPSC च्या विद्यार्थ्यांनी हे आंदोलन सुरु केलं आहे. महाराष्ट्र आयोगाने टायपिंग स्किल टेस्ट ही महाराष्ट्र परीक्षा परिषद यांच्या नियमानुसार न घेता अचानक त्यात बदल केले आहेत. ही टेस्ट राज्य परीक्षा परिषद यांच्या नियमानुसार केली पाहिजे, या मागणीसाठी विद्यार्थी आज रस्त्यावर उतरले आहेत. जोपर्यंत ही मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही असेच रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
























