Pune Metro News: भजन, पुस्तक प्रकाशन, चित्रपट प्रमोशन अन् आता थेट ढोल वादन; पुणे मेट्रो नक्की कशासाठी?
भद्राय या पथकाला पुणे मेट्रोकडून परवानगी देण्यात आली होती. त्यांना 15 ऑगस्टला हे ढोल वादन करायचं होतं मात्र त्यादिवशी नागरिकांची प्रचंड गर्दी असल्याने पुणे मेट्रोकडून त्यांना परवानगी देण्यात आली नव्हती.
Pune Metro News: पुणे मेट्रोत पुणेकर कधी काय करतील याचा नेम नाही. गणेशोत्सव तोंडावर आहे त्यामुळे सगळीकडे ढोल ताशाचा सराव जोमात सुरु आहे. मात्र आता पुण्यातील या ढोल ताशा पथकाने थेट पुण्याच्या मेट्रोत ढोलवादन केलं आहे. या वादनामुळे नागरीक अनेक प्रश्न उपस्थित करत आहे. पिंपरीतील भद्राय या ढोल पथकाने सर्व तयारीने मेट्रोत ढोल वादन केलं. या वादनाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्याच्या या वादनामुळे मेट्रो नेमकी प्रवासासाठी आहे की कार्यक्रमांसाठी आहे?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पुण्यात सध्या सगळीकडे गणेशोत्सवाची तयारी जल्लोषात सुरु आहे. दोन वर्षांनी यंदा पुण्यातील गणेशोत्सव जल्लोषात साजरा होणार असल्याने सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. शहरात ठिकठिकाणी ढोल वादनाचा आवाज घुमतो आहे. पथकं जोमात सराव करत आहेत. आजपर्यंत ढोल पथकाचं संचलन वादन, स्थिर वादन पुणेकरांनी अनुभवलं होतं मात्र आता पुणेकरांनी मेट्रोतील ढोल वादनदेखील अनुभवलं आहे.
भद्राय या पथकाला पुणे मेट्रोकडून परवानगी देण्यात आली होती. त्यांना 15 ऑगस्टला हे ढोल वादन करायचं होतं मात्र त्यादिवशी नागरिकांची प्रचंड गर्दी असल्याने पुणे मेट्रोकडून त्यांना परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे या पथकाने नंतरची तारीख मागितली होती. या वादनाला पुणे मेट्रोने परवानगी दिली असल्याचं पुणे मेट्रोचे जनसंपर्क अधिकारी हेमंत सोनवणे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.
पुणे मेट्रोतील करामती व्हायरल
पुणे मेट्रोमध्या करामतीचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते. मेट्रो सुरु झाल्यावर त्यात भजन, नाच, गाणी, पुणेरी भांडणं याचे व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झाले होते. तीन दिवसात किमान सात लाख पुणेकरांनी या मेट्रोचा प्रवास केला होता. काही दिवसांपुर्वी याच मेट्रोत पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रमदेखील पार पडला होता.
पुणे मेट्रोत वाढदिवसही करा साजरे
पुणे मेट्रोत नागरीकांना वेगळेवेगळ्या प्रकारचे सोहळे साजरे करता येणार आहे. त्यात वाढदिवस, वर्धापनदिन किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमाचं आयोजन करता येणार आहे. पुणे मेट्रो रेल्वेने खाजगी उत्सवांसाठी एक डबा देण्याची घोषणा केली. आणि ज्यांना वाढदिवस, वर्धापनदिन इत्यादी कार्यक्रम साजरे करायचे आहेत त्यांच्यासाठी डब्यात एक फेरी (येणे-येणे) दिली जाईल. हा उपक्रम खुला असेल. दोन्ही मार्गांवर - लाईन 1 (पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ते फुगेवाडी) आणि लाईन 2 (गरवारे कॉलेज ते वनाज) सुरु असेल. मात्र या सगळ्यांमुळे नियमित प्रवाशांना प्रवासासाठी कोणताही त्रास होणार नाही याची काळजी पुणे मेट्रो प्रशासनाकडून घेतली जाणार आहे.