गुंतवलेले पैसे परत मिळत नसल्याने डीएसके ठेवीदाराची आत्महत्या
डी. एस. कुलकर्णीकडे गुंतवलेले पैसे परत मिळण्याची आशा नसल्याचे पत्र लिहून एका ठेवीदाराने आत्महत्या केली आहे. तानाजी गणपत कोरके (60) असे आत्महत्या करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे.
पुणे : डी. एस. कुलकर्णीकडे गुंतवलेले पैसे परत मिळण्याची आशा नसल्याचे पत्र लिहून एका ठेवीदाराने आत्महत्या केली आहे. तानाजी गणपत कोरके (60) असे आत्महत्या करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. त्यांनी राहत्या घरी गुरुवारी (16 जानेवारी) गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.
मयत तानाजी कोरके हे रिक्षा ड्रायव्हर होते. मुंढवा परिसरात ते कुटुंबियांसह राहत होते. त्यांना चार मुली असून तीन मुलींची लग्न झाली आहेत. आर्थिक विवंचनेमुळे चौथ्या मुलीचं लग्न होत नसल्यामुळे मागील काही दिवसांपासून ते चिंतेत होते.
तानाजी कोरके यांनी लिहिलेल्या पत्रात त्यांनी गावाकडील अडीच एकर जमीन विकून आलेले चार लाख रुपये स्वतःच्या नावावर तर मुलींच्या मुलाच्या शिक्षणासाठी 50 हजार रुपये जावयाच्या नावावर डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्समध्ये गुंतवले होते. या गुंतवणुकीची मुदत 2017 मध्ये संपूनही पैसे मिळाले नाहीत. सतत चकरा मारल्यानंतरही पैसे मिळत नसल्याचे त्यांनी या चिट्ठीत नमूद केले आहे.
कोरके यांनी नातेवाईकांकडून पैसे उसने घेत तिसऱ्या मुलीचे लग्न केले. परंतु चौथ्या मुलीच्या लग्नासाठी पैसे नसल्याचे त्यांनी या पत्रात नमूद केले आहे. तसेच मी गुंतवणूक केलेले पैसे माझ्या वारसांना देण्यात यावे आणि त्यातून तिचे लग्न करण्यात यावे, तेव्हाच माझ्या आत्म्याला शांती मिळेल, असे त्यांनी या पत्रात नमूद केले आहे. तसेच माझ्या आत्महत्येप्रकरणी डी. एस. कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, असेही त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.
माझ्या अंत्यसंस्काराची जबाबदारी माझे मित्र आणि मेहुण्यावर सोपवावी. मी मित्र संतोष घोडके यांना अंत्यविधीसाठी लागणाऱ्या खर्चासाठीचे पैसे दिले आहेत. त्यांना कुठलाही पोलिसी त्रास होऊ नये. मी काय करणार आहे, हे त्यांना माहीत नाही. त्यामुळे त्यांच्यावर कसलाही संशय घेऊ नये. अशी माझी शेवटची इच्छा आहे. अशी वेळ इतरांवर येऊ नये, अशीच प्रार्थना मी सरकारला करत आहे. शेवटी त्यांनी 'पुण्यातील सुरवातीपासूनचा शिवसैनिक' असे पत्रात नमूद करत आयुष्याचा शेवट केला आहे.