पुण्यातील बागेश्वरधाम महाराजांच्या कार्यक्रमाला अजित पवार गटाचा विरोध, भाजपकडून कार्यक्रमाचं आयोजन
बागेश्वर बाबा आणि वाद हे समीरकरण नेहमीच पाहायला मिळतं. पण यावेळी हा वाद राज्यातील सत्तेत सहभागी असलेल्या भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्र्वादीतच पाहायला मिळतोय.
पुणे : भाजपचे (BJP) पुण्यातील माजी आमदार जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांच्याकडून बागेश्वर बाबांच्या (Bageshwar Baba) सत्सगांचे आयोजन करण्यात आलं. 20,21 आणि 22 नोव्हेंबर असे तीन दिवस हा सत्संग पुण्यातील संगमवाडी इथे चालणार आहे. मात्र भाजपचा मित्रपक्ष असलेल्या अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमाला विरोध करण्यात आलाय. बागेश्वर बाबांनी संत तुकाराम महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) राज्याचे सोशल मीडियाचे प्रमुख सुदर्शन जगदाळे यांनी बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमाला विरोध केलाय.
बागेश्वर बाबा आणि वाद हे समीरकरण नेहमीच पाहायला मिळतं. पण यावेळी हा वाद राज्यातील सत्तेत सहभागी असलेल्या भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्र्वादीतच पाहायला मिळतोय. भाजपचे पुण्यातील माजी आमदार जगदीश मुळीक यांच्याकडून बागेश्वर बाबांच्या तीन दिवसांच्या सत्संगाचे आयोजन करण्यात आले. मात्र अजित पवार गटाकडून बागेश्वर बाबांच्या या कार्यक्रमाला जाहीर विरोध करण्यात आलाय. बागेश्वर बाबांनी संत तुकाराम महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून या बागेश्वर बाबांना विरोध करत असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलचे राज्य प्रमुख सुदर्शन जगदाळे यांनी म्हटलंय.
कार्यक्रमाची जोरदार तयारी
एकीकडे अजित पवार गटाकडून विरोध होत असताना दुसरीकडे या कार्यक्रमाची जोरदार तयारी पुण्यातील संगमवाडी भागात सुरू आहे. जगदीश मुळीक यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कटआउट्स सगळीकडे लावण्यात आलेत. तीन दिवस चालणाऱ्या या सत्संगाला देवेंद्र फडणवीस हजेरी लावणार असल्याचं आयोजकांकडून सांगण्यात आले आहे. तर राष्ट्रवादीच्या विरोधावर बोलताना अजित पवार किंवा सुनील तटकरे जेव्हा विरोध करतील तेव्हा बघू असं माजी आमदार जगदीश मुळीक यांनी म्हटलंय.
तीन पक्षांमध्ये सर्वकाही आलबेल नाही
बागेश्वर बाबांच्या पुण्यातील कार्यक्रमांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीने देखील विरोध केलाय. धार्मिक संत्सगाच्या नावाखाली बागेश्वर बाबा समाजात अंधश्रद्धा पसरवत असल्याचं अंनिसने म्हटले आहे. बागेश्ववर बाबांच्या सत्संगांचे ठिकठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. बागेश्वर बाबांच्या माध्यमातून हिंदुत्वाची मतपेढी स्वतःकडे खेचण्याचा भाजप प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. पण आता बागेश्वर बाबांना विरोध मित्र पक्ष म्हणवणाऱ्या अजित पवार गटाकडूनच होऊ लागल्यानं राज्यातील सत्तेत सहभागी असलेल्या तीन पक्षांमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय .
सत्तेत सहभागी असलेले दोन पक्ष हिंदुत्वाच्या आधारे राजकारण करणारे तर तिसरा अजित पवारांचा गट हा पुरोगामित्वाचा दाखल देणारा . एरवी हा विरोधाभास चालूनही जातो. पण जेव्हा बागेश्वर बाबांच्या माध्यमातून मतपेढी तयार करण्याचा प्रयत्न होईल तेव्हा अडचण फक्त विरोधकांची होणार नाही तर अजित पवारांसारख्या मित्रांची देखील होणार आहे. कर्ण बागेश्वर बाबांचे सत्संग जरी धार्मिक असले तरी त्यांचे परिणाम पूर्णतः राजकीय असतात .