राष्ट्रवादीचे आमदार फुटण्याच्या चर्चांमध्ये तथ्य नाही : अजित पवार
पक्ष सोडल्यावर काय निकाल लागतो, हे साताऱ्यात सगळ्यांना दिसलं. जर कुठल्या पक्षाने आमदार फोडले, तर इतर तिन्ही पक्ष एकत्र येवून त्यांचा पाडाव करतील, असं अजित पवारांनी म्हटलं.
बारामती : शरद पवार यांची आज पुण्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत बैठक आहे. ही बैठक पक्षांतर्गत आहे. पवारसाहेब नेहमीच पक्षातील नेत्यांना घेवून चर्चा करत असतात. मात्र त्याची प्रसिद्धी कशासाठी केली जाते माहित नाही. आमदार फुटण्याच्या ज्या चर्चा समोर येत आहेत, त्यामध्ये तथ्य नसल्याचं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा 58वा गव्हाण पूजन व गळीत हंगामाचा कार्यक्रम अजित पवार यांच्या हस्ते पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.
माझ्या नावानेही एक बातमी चालवली गेली. अनेकजण पहिल्यांदाच निवडून आलेले असल्याने कुणीही फुटमार नाही. पक्ष सोडल्यावर काय निकाल लागतो, हे साताऱ्यात सगळ्यांना दिसलं. त्यामुळे आता कुणी असं करणार नाही. कर्नाटकचा निकाल काय लागला हेही जनतेने पाहिले आहे. जर कुठल्या पक्षाने आमदार फोडले, तर इतर तिन्ही पक्ष एकत्र येवून त्यांचा पाडाव करतील. फॉर्म्युला ठरला याबद्दलच्या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही. अद्याप काहीही ठरलेलं नाही. याबद्दल तिन्ही पक्षाचे सर्वोच्च नेते निर्णय घेत नाहीत, तोपर्यंत या बातम्यांमध्ये तथ्य नाही. आता 19 नोव्हेंबरला सोनिया गांधी आणि शरद पवार यांची भेट होईल. त्यानंतर सगळं चित्र स्पष्ट होईल, असं अजित पवारांनी सांगितलं.
भाजपकडे बहुमत असताना त्यांनी सत्ता स्थापन केली नाही. आम्ही विरोधी पक्षात बसण्याच्या मानसिकतेत होतो. मात्र आता राष्ट्रपती राजवट लागल्यानंतर सत्तेबाबत मार्ग काढता येतो का याबद्दल सगळेच प्रयत्न करत आहेत. जोपर्यंत 145 च्या पुढे आकडा होत नाही, तोपर्यंत गोड बातमी येणार नाही. तोपर्यंत आपल्याला राष्ट्रपती राजवटीतच राहावं लागणार असल्याचं अजित पवार म्हणाले.
शेतकऱ्यांना मिळालेली मदत तुटपुंजी
राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलेली मदत अतिशय तुटपुंजी आहे. प्रत्यक्ष नुकसान पाहून मदत दिली पाहिजे. सध्या राष्ट्रपती राजवट आहे, त्यामुळे सगळे निर्णय केंद्रातून होतात. या पार्श्वभूमीवर आमचे सगळे खासदार याबद्दल केंद्रात आवाज उठवून शेतकऱ्यांना दिलासा देतील.