PM Modi: हिंदू-मुस्लीम भेदभाव केला तर मी सार्वजनिक जीवनात राहण्याच्या पात्रतेचा उरणार नाही, 'त्या' वक्तव्यावर पंतप्रधान मोदींचं स्पष्टीकरण
PM Modi : पंतप्रधान मोदी यांच्याकडून मुस्लीम समुदायासंदर्भात केलेले एक वक्तव्य सध्या चांगलेच गाजत आहे. काँग्रेसची सत्ता आली तर हिंदू महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, संपत्ती सर्वकाही जास्त मुलं असलेल्या लोकांमध्ये वाटलं जाईल, असे मोदींनी म्हटले होते.

नवी दिल्ली: या देशातील नागरिक माझ्यासाठी मतदान करतील, हा विश्वास मला आहे. मी ज्यादिवशी हिंदू आणि मुसलमान असा भेद करायला सुरुवात करेन त्या क्षणापासून मी सार्वजनिक आयुष्यात राहण्याच्या पात्रतेचा उरणार नाही. हिंदू-मुस्लीम भेदभाव करायचा नाही, हा माझा दृढनिश्चय आहे, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी एका सभेत देशातील संपत्तीच्या वाटपाच्या मुद्द्यावरुन काँग्रेसवर टीका केली होती. देशात काँग्रेसची सत्ता आली तर ते हिंदू आया-बहिणींचे मंगळसूत्र आणि तुमची संपत्ती ही जास्त मुलं असलेल्यांना दिली जाईल, असे मोदींनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी 'नेटवर्क 18 इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत आपण हिंदू आणि मुस्लीम असा कोणताही भेद करत नसल्याचे सांगितले.
मी जास्त मुलं असलेल्यांना असा उल्लेख केला त्यामध्ये हिंदू अथवा मुस्लीम, असे काहीही म्हटले नव्हते. माझं इतकंच म्हणणं आहे की, तुम्ही जितक्या मुलांचं पालनपोषण करु शकतात, तितकीच मुलं जन्माला घाला. तुमच्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी सरकारची मदत घ्यावी लागेल, अशी वेळ येऊ देऊ नका, असे मोदी यांनी स्पष्ट केले.
मुस्लीम समाज तुम्हाला मतं देईल का? मोदी म्हणाले...
या मुलाखतीत पंतप्रधान मोदींना देशातील मुस्लीम समाज तुम्हाला मतदान करेल, असे वाटते का, हा प्रश्न विचारण्यात आला. यावर मोदींनी म्हटले की, मी हे मानतो की, माझ्या देशातील नागरिक मला मतदान करतील. मी ज्यादिवशी हिंदू-मुसलमान करेल ना, त्यादिवशी सार्वजनिक जीवनात राहण्याची माझी योग्यता उरणार नाही. हिंदू-मुस्लीम असा भेद करायचा नाही, हा माझा संकल्प आहे, असे मोदी यांनी म्हटले.
पंतप्रधान मोदी काय म्हणाले होते?
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांनी राजस्थानच्या बंसवारा येथे सभा घेतली होती. या सभेत मोदींनी काँग्रेसवर टीका करताना म्हटले होते की, पूर्वी त्यांचे सरकार होते तेव्हा त्यांनी म्हटले होते की, देशातील संपत्तीवर पहिला हक्क मुसलमानांचा आहे. याचा अर्थ ते संपत्ती जमा करुन कोणाला वाटणार? ज्यांची जास्त मुलं आहेत, त्यांना वाटणार, घुसखोरांना वाटणार. तुमच्या मेहनतीची कमाई घुसखोरांना दिली जाणार का? तुम्हाला ही गोष्ट मंजूर आहे का?, असा सवाल मोदींनी विचारला होता.
आणखी वाचा
प्रफुल पटेलांनी मोदींच्या डोक्यावर जिरेटोप चढवला; शिवप्रेमी संतापले, विरोधकांची आगपाखड
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
