राज्याच्या विकासासाठी राष्ट्रवादी एकसंघ होण्यास संमती असेल पण..., आमदार सुनील शेळके म्हणाले एक गोष्ट करणं आवश्यक...
Sunil Shelke : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या एकत्रीकरणासंदर्भात भाष्य कलं आहे.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या दोन्ही पक्षांचा वर्धापन सोहळा पुण्यात होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन 10 जून रोजी असतो. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी आषाढी एकादशी पर्यंत पांडुरंगाची इच्छा असली तर बहीण-भाऊ आषाढी एकादशीपर्यंतही एकत्र येऊ शकतात, असं म्हटलं होतं. आता मावळचे आमदार सुनील शेळके यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी एकसंघ होत असेल तर ते मान्य करु असं सुनील शेळके म्हणाले आहेत.
महायुतीमधील घटक पक्षांची संमती घ्यावी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणण्यापेक्षा पवार परिवार तर नक्कीच आम्हाला आनंद आहे. अजित पवारांचा महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला तो व्यक्तीश अजितदादा यांचा नव्हता. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी सर्व मंडळींनी संमती दिली. दादांना पुढं केलं आणि आपण महायुतीसोबत जाऊया असा निर्णय झाला. दोन वर्षांपूर्वी आम्ही महायुतीसोबत गेलो. अजित पवार यांच्यावर अनेकांनी टीका टिप्पणी केली, अजित पवारांना व्हिलन करण्यात आलं,असं सुनील शेळके म्हणाले. ज्यांनी व्हिलन केलं त्यांनी केलं, जो माणूस स्पष्टपणे बोलतो, स्पष्टपणाची भावना ठेवत राजकारण करतो त्या व्यक्तिमत्त्वाला व्हिलन करण्याचा प्रयत्न केला. आता तुम्ही त्यांचं नेतृत्त्व आम्हाला मान्य आहे ज्यावेळी हे म्हणता त्यावेळी तुमच्या मनात कुठंतरी शंकेची पाल चुकचुकतेय, असं सुनील शेळके म्हणाले.
अजित पवार जो निर्णय घेतील तो निर्णय मान्य आहे. परंतु, मागच्या काही महिन्यांपूर्वी विधानसभेला सामोरं गेलो, लोकसभेला सामोरं गेलो. महायुती म्हणून निवडणूक लढवली, त्यांनी महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवली. आता त्यांना सोबत घेत असताना भाजप, शिंदे गटासह महायुतीतील घटक पक्षाची संमती असली पाहिजे. आज भाजप, शिवसेना, आरपीआय इतर पक्ष यांची संमती असणं आवश्यक आहे. राष्ट्रवादी एकसंघ झाली तर त्याचा सरकार म्हणून फायदा होईल, तोटा होईल. एकत्र आलो तर चांगलं होईल, याचा विचार करण्याची गरज असल्याचं सुनील शेळके म्हणाले.
महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी, राज्य विकासाच्या वाटेवर जात असेल तर त्यासाठी दादांनी किंवा इतर नेतृत्त्वानं मान्यता दिली तर आम्ही स्वीकारुन काम करु असं सुनील शेळके म्हणाले. परिवार म्हणून शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे एकत्र येत असतील तर आनंद आहे. मात्र, राजकारण म्हणून आमच्या इतर सहकाऱ्यांना देखील ते मान्य झालं पाहिजे, असं सुनील शेळके म्हणाले.























