Sanjay Raut: गोपीनाथ मुंडेंच्या काळापासून भाजपकडून शिवसेनेचे उमेदवार पाडण्याचं राजकारण, संख्याबळाच्या आधारे मुख्यमंत्री ठरवणे धोकादायक फॉर्म्युला: सामना
Maharashtra Politics: लाडकी बहीण योजनेच्या श्रेयावरुन महायुतीत असलेली बिघाडी दुरुस्त करा मग इतरांच्या चेहऱ्यावर बोला. फडणवीसांच्या मनात उद्धव ठाकरे यांच्या लोकप्रियतेची व नेतृत्वाची भीती बसली आहे. 'सामना'तून जोरदार टीका
मुंबई: संख्याबळाच्या आधारे नेता निवडणे हे धोक्याचे ठरते. याच संख्याबळाच्या प्रकरणात भाजपने तीन निवडणुकांमध्ये शिवसेनेचे उमेदवार पाडले, ही वस्तुस्थिती आहे. त्यावेळी गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचे राजकारण हे शिवसेना (Shivsena Thackeray Camp) आमदारांचा आकडा कसा कमी होईल, यास खतपाणी घालणारे होते. देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) तेच केले व आता महायुतीत तोच पाडापाडीचा खेळ होणार, हे निश्चित आहे, असे भाष्य ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या दैनिक 'सामना'तून करण्यात आले आहे.
महाविकास आघाडी उद्धव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पाहत नाही, हे फडणवीसांचे मत आहे. मुळात फडणवीस यांचे गुप्तहेर आणि राजकीय आकलन तोकडे पडत आहे. त्यांच्या छचोर चाणक्यगिरीचा बाजार उठल्याने त्यांचा गोंधळ उडाला आहे. आपल्याला मुख्यमंत्री व्हायचे नाही, पण महाविकास आघाडीने एक चेहरा समोर आणावा, त्यास मी पाठिंबा देतो, असा खुला आवाज उद्धव ठाकरे यांनी शरद पवार, मल्लिकार्जुन खरगे, रमेश चेन्नीथला वगैरे प्रमुख नेत्यांमसोर दिला. हे करायला वाघाचे काळीज लागते. त्याबद्दल उद्धव ठाकरे कौतुकास पात्र आहेत. मात्र, देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरे हे मविआचा मुख्यंत्रीपदाचा चेहरा नसतील अशी बासुंदी उधळत आहेत. त्यांचे गणित कच्चे आहे व निराशेने त्यांना ग्रासलेले आहे, हेच स्पष्ट आहे. स्वत:च्या काळवंडलेल्या चेहऱ्याची काळजी करण्यापेक्षा दुसऱ्यांच्या चेहऱ्याची उठाठेव करणे फडणवीस यांनी थांबवायला हवे, असे 'सामना'च्या अग्रलेखात म्हटले आहे.
'सामना'च्या अग्रलेखात काय म्हटलंय?
हरयाणा, जम्मू-कश्मीर या दोन्ही राज्यांत भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव होत आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींचा चेहरा दोन्ही राज्यांत चालणार नाही यावर दुमत असण्याचे कारण नाही. महाराष्ट्र व झारखंड राज्यांच्या निवडणुकाही हरयाणाबरोबर व्हायला हरकत नव्हत्या, पण इथेही मोदी-शहांचे चेहरे लोकांना पसंत नाहीत. मिंध्यांनी गुवाहाटीत रेड्यांचे कितीही बळी दिले तरी महाराष्ट्राच्या जनतेचे मनपरिवर्तन होणार नाही, असेच एकंदरीत वातावरण आहे. पुन्हा ज्यांना स्वतःचा चेहरा धड नाही असे देवेंद्र फडणवीस दुसऱ्यांच्या चेहऱ्याची उठाठेव करतात हे गमतीचे आहे.
महाराष्ट्राला मोदी-शहा मान्य नाहीत व फडणवीसांचा बदनाम चेहरा राज्यातील जनतेने नाकारला आहे, पण स्वतःचा चेहरा झाकून फडणवीस यांनी जाहीर केले की, उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचा चेहरा नसतील. ही नसती उठाठेव करण्याचा अधिकार फडणवीस यांना कोणी दिला? अशा उठाठेवी करण्याआधी आपल्या भरगच्च बुडाखाली काय जळतेय याची काळजी त्यांनी घ्यायला हवी. मुळात त्यांच्या तथाकथित महायुतीत मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीस-मिंधे व अजित पवार यांच्यातच खेचाखेची सुरू आहे. फडणवीस हे ठामपणे सांगू शकतील काय की, 2024 ला निवडणुका होताच मिंधे हेच मुख्यमंत्रीपदावर राहतील? अजितदादा तर मुख्यमंत्रीपदासाठी इतके उतावीळ आहेत की, त्यांनी स्वतला गुलाबी रंगात न्हाऊन घेतले आहे आणि फडणवीस तर नागपूरच्या खिडकीत बसून येणाऱ्या- जाणाऱ्यांना "शुकाऽ। शुकाऽ" करून बोलवत आहेत. या तिघांच्या तीन तऱ्हा असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार नाहीत असे फडणवीस सांगत आहेत. म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या लोकप्रियतेची व नेतृत्वाची भीती त्यांच्या मनात बसली आहे, असे 'सामना'च्या अग्रलेखात म्हटले आहे.
सामनातून फडणवीसांवर घणाघाती टीका
'मुख्यमंत्रीपदाचा चेहरा विधानसभा निवडणुकीनंतरच ठरवू. विधानसभा निवडणूक मिंध्यांच्याच नेतृत्वाखाली लढणार, परंतु नंतर मुख्यमंत्री कोण होणार हे सांगू शकत नाही.' यांच्याच बुडाखालची स्थिती ही असताना हे महाशय दुसऱ्यांचे बूड का खाजवत बसले आहेत? 'लाडकी बहीण योजने'च्या श्रेयावरूनही तिघांमध्ये बिघाडी आहे. ती आधी दुरुस्त करा आणि मग इतरांच्या चेहऱ्यावर बोला! 2019 ला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील व ते लोकप्रिय मुख्यमंत्री ठरतील असे फडणवीसांना किंचितही वाटले होते काय? पण ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यांनी शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईतून व जनतेला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढले. आपल्या साधेपणाने त्यांनी महाराष्ट्राचे मन जिंकले. ठाकऱ्यांच्या अडीच वर्षाच्या काळात कट-कारस्थानांचे गावठी उद्योग महाराष्ट्रात बंद झाले हे सत्य नाही काय? पण दिल्लीत कट-कारस्थाने घडवून गुजराती व्यापाऱ्यांनी त्यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार पाडले व मिथेंसारखे मतलबी लोक डरपोक स्वभावानुसार दिल्लीकरांना शरण गेले. यात शौर्य ते कसले? स्वतः फडणवीस हे अपमान सहन करून सध्या सत्तेत आहेत. त्यांचा चेहराच त्याची साक्ष देतोय, अशी टीका 'सामना'च्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.
आणखी वाचा
बॉम्बे नको मुंबई नाव हवं, अशी मागणी करणारा मी होतो; किमान तुमच्या घरात तरी मातृभाषेत बोला : अमित शाह