Worli Hit & Run : राज्याचे गृहमंत्री युजलेस, संजय राऊतांचा हल्ला, मुख्यमंत्र्यांना म्हणाले, मृत्यू झालेली स्त्री खोकेवाल्याची पत्नी नाही
Sanjay Raut On Devendra Fadnavis: निर्दयीपणे कावेरी नाखवांना चिरडलं गेलं, ती तुमची लाडकी बहीण नाही का? असं म्हणत राऊतांनी थेट हल्ला चढवला आहे.
Sanjay Raut On Worli Hit And Run Case : मुंबई : वरळी (Worli Accident) हिट अँड रन प्रकरणावर (Hit And Run Case) बोलताना ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना चांगलंच फैलावर घेतलं. मुख्यमंत्र्यांनी वरळी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या कावेरी नाखवा यांच्या कुटुंबीयांना 10 लाखांची मदत जाहीर केलीय, यावरुनही संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर ताशेरे ओढले आहेत. मुख्यमंत्री पैसे वाटत फिरतायत, ती महिला काय खोकेवाल्या आमदाराची बायको आहे? असा परखड सवालच संजय राऊतांनी विचारला आहे. तसेच, मी वैयक्तिक टीका करत नाही, पण राज्याचे गृहमंत्री युजलेस आहेत, असं म्हणत संजय राऊतांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही खडे बोल सुनावले आहेत. तसेच, निर्दयीपणे कावेरी नाखवांना चिरडलं गेलं, ती तुमची लाडकी बहीण नाही का? असं म्हणत राऊतांनी थेट हल्ला चढवला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत बोलताना म्हणाले की, "जोपर्यंत वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी आणि त्यांचं कुटुंबीय यांना शिक्षा होत नाही, तोपर्यंत तुमच्या 10 लाखांना किंमत नाही. त्यांचा जीव 10 लाखांचा आहे का? असं काय झालं की, मुख्यमंत्री पैसे वाटत फिरतायत, ते काय खोकेवाल्या आमदाराची बायको आहे की, खोकेवाले आहेत ते? आले की, पैसे वाटायचे, याला वाटा, त्याला वाटा. कायदा-सुव्यवस्था या राज्यात नग्न झालेली आहे, चिरडून मरतेय. राज्याचे गृहमंत्री, मी व्यक्तीगत म्हणत नाही, युजलेस गृहमंत्री आहेत. आतापर्यंत एवढी भीषण दुर्घटना मुंबईच्या रस्त्यावर घडली, गृहमंत्र्यांकडून साधं निवेदन नाहीतर, साधी संवेदनाही नाही."
वरळी अपघात प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालावं, अशी मागणी करणार : संजय राऊत
वरळी हिट अँड रन प्रकरणावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, "वरळी अपघात प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालावं, अशी आम्ही मागणी करणार आहोत. तसेच, गुन्हेगारांना फाशीची शिक्षा दिली जावी, अशीही आमची मागणी असेल."
निर्दयीपणे कावेरी नाखवांना चिरडलं गेलं, ती तुमची लाडकी बहीण नाही का? : संजय राऊत
वरळी हिट अँड रन प्रकरणात मृत्यू झालेल्या कावेरी नाखवा यांच्या कुटुंबीयांना 10 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. यावर बोलताना संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला संजय राऊत म्हणाले की, काय चाललंय? 10 लाख रुपये दिले. चेंगराचेंगरी झाली, 5-5 लाख रुपये दिले, 50 लाख दिले. अपघात झाला, खून झाला 50 लाख दिले. हे काय पैशांचं राजकारण सुरूय काय? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा तुम्ही केलीत. मुंबईच्या रस्त्यावर कावेरी नाखवांचा मृत्यू झाला. ज्यांच्या मुलानं हे केलं, तो एकनाथ शिंदे यांचा निकटवर्तीय आहे. निर्दयीपणे कावेरी नाखवांना चिरडलं गेलं, ती तुमची लाडकी बहीण नाही का? कुठे आहेत गृहमंत्री? या राज्याला गृहमंत्री आहेत की नाही? शांत का बसलेत? महिलेचा आक्रोश तुमच्या कानांपर्यंत पोहोचला नाही?"
पाहा व्हिडीओ : Sanjay Raut on Worli Hit and Run : वरळीतील हिट अँड रन प्रकरणावरुन राऊतांचा गृहमंत्र्यांवर निशाणा