Ravi Rana : मी नाराज नाही, देवेंद्र फडणवीस अमरावतीमधून योग्य व्यक्तीची निवड करतील : रवी राणा
Ravi Rana On Cabinet Expansion : अमरावती जिल्ह्याला कोण योग्य न्याय देऊ शकतो याची फडणवीस यांना चांगली कल्पना आहे, ते योग्य व्यक्तीची लवकरच निवड करतील, असं अपक्ष आमदार रवी राणा म्हणाले.
Ravi Rana On Cabinet Expansion : शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये (Maharashtra Cabinet Expansion) मंत्रिपद न मिळाल्याने अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) हे नाराज झाल्याचं पाहायला मिळालं. परंतु देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) अमरावतीमधून (Amravati) योग्य व्यक्तीची निवड करतील, असा विश्वास आमदार रवी राणा यांनी व्यक्त केला. एबीपी माझासोबत संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं.
"उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षे ऑनलाईन सरकार चालवलं. मात्र आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने मजबूत सरकार आले आहे. मी कधीही मंत्रिपद मागितलं नाही आणि मी नाराजही नाही. कुठल्याही अपक्ष आमदाराने नाराज व्हायची गरज नाही. देवेंद्र फडणवीस यांना अमरावती जिल्ह्याची जाण आहे. ते योग्य वेळी योग्य व्यक्तीची निवड अमरावतीमधून मंत्री आणि पालकमंत्री म्हणून करतील, असं आमदार रवी राणा यावेळी म्हणाले. अमरावती जिल्ह्याला कोण योग्य न्याय देऊ शकतो याची फडणवीस यांना चांगली कल्पना आहे, ते योग्य व्यक्तीची लवकरच निवड करतील, असंही रवी राणा म्हणाले.
अखेर मंत्रिमंडळ विस्तार पार पडला
40 दिवसांपासून रखडलेला शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर मंगळवारी (9 ऑगस्ट) पार पडला. राजभवनातील दरबार हॉलमध्ये एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये शिंदे गटाचे नऊ तर भाजपकडून नऊ जणांचा शपथविधी पार पडला. या सर्व आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकूण 20 जणांचे हे मंत्रिमंडळ असणार आहे.
शिंदे गटातील नऊ मंत्री
गुलाबराव पाटील
दादा भुसे
संजय राठोड
संदीपान भुमरे
उदय सामंत
तानाजी सावंत
अब्दुल सत्तार
दीपक केसरकर
शंभूराज देसाई
भाजपतील नऊ मंत्री
राधाकृष्ण विखे पाटील
सुधीर मुनगंटीवार
चंद्रकांत पाटील
विजयकुमार गावित
गिरीश महाजन
सुरेश खाडे
रवींद्र चव्हाण
अतुल सावे
मंगलप्रभात लोढा
दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळण्याची कडू, राणा यांना अपेक्षा
शिवसेनेत झालेल्या बंडखोरीच्या वेळी प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला. तर दुसरीकडे विधानसभा अध्यक्षांची निवड आणि विश्वासदर्शक ठरावात रवी राणा यांनी भाजपची साथ दिली. महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री होते.परंतु शिंदे-फडवणीस यांच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात रवी राणा, बच्चू कडू यांना संधी मिळालेली नाही. त्यामुळे ते नाराज असल्याचं म्हटलं जात आहे. आपण नाराज नसल्याचं जरी ते सांगत असले तरी त्यांच्या वक्तव्यांवरुन त्यांची नाराजी स्पष्ट दिसते. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळाली नाही तरी दुसऱ्या विस्तारात संधी मिळेल, असा आशावाद त्यांना आहे.
Ravi Rana Amravati : Devendra Fadnavis योग्य मंत्री आणि पालकमंत्री निवडतील, मी नाराज नाही : रवी राणा