Raj Thackeray : मनमोहन सिंगांनी शांतपणे जे करून दाखवलं ते अनेकांना बोलून पण करुन दाखवता आलेलं नाही: राज ठाकरे
Raj Thackeray: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. अशातच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन त्यांना आदरांजली वाहिली आहे.
Raj Thackeray on Manmohan Singh Death मुंबई : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh Passed Away) यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यावर शनिवारी (28 डिसेंबर) अंत्यसंस्कार होणार आहेत. आपल्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत त्यांनी भारताला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले. वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून त्यांनी देशातील गोरगरीब, दीनदुबळ्यांची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान, देशाचे माजी पंतप्रधान, दूरदृष्टी असलेला संयमी नेता आणि जागतिक पातळीवरील ख्यातनाम अर्थतज्ज्ञ अशी ओळख असलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांच्या जाण्याने संपूर्ण देशातून शोक व्यक्त करण्यात येतोय.
शिवाय राजकीय क्षेत्रातूनही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. यांच्या निधनानंतर त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला जात आहे. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन त्यांना आदरांजली वाहिली आहे. सोबतच मनमोहन सिंग यांनी केलेल्या अनेक आठवणींनाही राज ठाकरे यांनी उजाळा दिला आहे.
भारताच्या या काळाचा खरा शिल्पकार म्हणजे डॉ. मनमोहन सिंग
भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं निधन झालं. 1991 ला जेंव्हा मनमोहन सिंग देशाचे अर्थमंत्री झाले तेंव्हा देशाची अर्थव्यवस्था अतिशय तोळामासाची होती. एका बाजूला बर्लिन भिंत कोसळली होती आणि शीतयुद्धाचा शेवट झाला होता, साम्यवादी चीनच्या आर्थिक ताकदीची चुणूक दिसायला लागली होती. अशावेळेस भारतीय उद्योगांच्या पायात आधीच्या काँग्रेसच्या सरकारांनी ज्या बेड्या घातल्या होत्या, त्या तोडून काढण्याचं काम डॉ. मनमोहन सिंग यांनी उदारीकरणाचे धोरण स्वीकारून केलं. अर्थात नरसिंहरावांसारख्या पंतप्रधानाची साथ त्यांना लाभली हे देखील खरं.
जुलै 1991 साली संसदेत भाषण करताना मनमोहनसिंगांनी एक वाक्य वापरलं होतं, "no power on earth can stop an idea whose time has come". थोडक्यात भारताचा काळ सुरु होत आहे आणि आता त्याला कोणीच थांबवू शकत नाही. भारताच्या या काळाचा खरा शिल्पकार म्हणजे डॉ. मनमोहन सिग.
इतिहास कधीच क्रुद्ध होणार नाही, उलट त्यांचा गौरव करेल
पुढे ते देशाचे पंतप्रधान झाले. आणि ते देखील सलग दहा वर्ष. अशा पदावर बसलेल्या व्यक्तीच्या हातून घेतलेले काही निर्णय हे चांगले, तर काही चुकणार हे स्वाभाविक आहे. पण दुर्दैवाने त्यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात त्यांच्यावर ज्या पद्धतीने टीका केली गेली, त्यांच्या हेतुंवर शंका घेतली गेली, त्यावरून पत्रकारांशी संवाद साधताना एक वाक्य म्हणाले होते, "I do not believe that I have been a weak Prime Minister. I honestly believe that history will be kinder to me than the contemporary media or for that matter the Opposition in Parliament.... "
डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर इतिहास कधीच क्रुद्ध होणार नाही, उलट त्यांचा गौरव करेल हे नक्की. भारतीयांमध्ये मग ते उद्योजक असोत, व्यावसायिक असोत, की नोकरदार वर्ग असो, अधिक उत्तम काहीतरी करावं, घडवावं यासाठी 'ये दिल मांगे मोअर..' ही जी वृत्ती भिनली आहे, त्याचे शिल्पकार हे डॉ. मनमोहन सिंगच.
डॉ. मनमोहन सिंग यांच्याबद्दल जगभरात एक उत्कृष्ट अर्थतज्ज्ञ म्हणून आदर होता, पुढारलेल्या देशांचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान यांच्या कृतीतून आणि वक्तव्यातून तो दिसून यायचा. जगभरातील अनेक विद्यापीठांमध्ये त्यांच्या ज्ञानाचा आणि कार्याचा गौरव झाला होता. इतकी बुद्धिमत्ता आणि कर्तृत्व असलेल्या मनमोहन सिंगांनी न बोलता, शांतपणे जे करून दाखवलं ते अनेकांना बोलून पण करून दाखवता आलेलं नाही.
डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विनम्र अभिवादन... अशा शब्दात राज ठाकरे यांनी डॉ. मनमोहन सिंगयांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन त्यांना आदरांजली वाहिली आहे.
हे ही वाचा