Narhari Zirwal : आधी हिंगोलीच्या पालकमंत्रिपदावरून खदखद, आता नरहरी झिरवाळांचा वक्तव्यावरुन यू-टर्न; म्हणाले....
Narhari Zirwal : गरीब माणसाला गरीब जिल्ह्याचं पालकमंत्री केलं, असे म्हणत नरहरी झिरवाळ यांनी हिंगोलीच्या पालकमंत्रिपदावरून खदखद बोलून दाखवली होती.
Narhari Zirwal : राज्य सरकारने पालकमंत्र्यांची यादी (Maharashtra Guardian Ministers List) जाहीर करताच महायुतीतील (Mahayuti) वाद चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय अवघ्या एका दिवसात मागे घेण्याची वेळ राज्य सरकारवर आली. तर हिंगोलीचे पालकमंत्रिपद मिळालेल्या नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी देखील एका कार्यक्रमात आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. गरीब माणसाला गरीब जिल्ह्याचं पालकमंत्री केलं, असे त्यांनी म्हटले यामुळे नरहरी झिरवाळ हे पालकमंत्रिपदावरून नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. आता नरहरी झिरवाळ यांनी आपल्या वक्तव्यावर सारवासारव केली आहे.
शनिवारी हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे आमदार राजू नवघरे यांच्या वतीने हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात बोलताना नरहरी झिरवाळ यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, जिथे एमआयडीसी नाही, अशा जिल्ह्याचे नाव हिंगोली, अशा हिंगोलीचे पालकत्व माझ्याकडे दिले आहे. मी गरीब असल्यानेच गरीब जिल्ह्याचे पालकमंत्रिपद दिले. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी सोपविलेली जबाबदारी आनंदाने पार पाडेन पण माझ्यावर हिंगोलीसारख्या गरीब जिल्ह्याची पालकमंत्रिपदाची जबाबदारी का दिली? याचा वरिष्ठांना जाब विचारणार, असे नरहरी झिरवाळ यांनी म्हटले.
नरहरी झिरवाळांची सारवासारव
नरहरी झिरवाळांच्या वक्तव्यानंतर ते नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. आज रविवारी (दि. 26) त्यांना याबाबत विचारले असता नाराजगी वगैरे काही नाही. इथे आल्यावर सर्व नेत्यांनी मला सांगितलं की, आमचा जिल्हा हा मागास जिल्हा म्हणून बघितला जातो. महाराष्ट्रात औद्योगिक क्षेत्र नाही असा जिल्हा कोणता तर तो हिंगोली सांगितले जाते. पाण्याच्या, सिंचनाच्या संदर्भात सुद्धा कमी व्यवस्था असलेला जिल्हा म्हणजे हिंगोली सांगितले जाते. त्यामुळे अशा गरीब जिल्ह्यात मला गरिबाला पालकमंत्री केलं, याचा अर्थ मी ते टोचून बोललेलो नाही. तर माझ्यावर एक चॅलेंज दिले आहे, त्यासाठी मी बोललो. माझी कधीही नाराजी राहणार नाही. झिरवाळ आणि नाराजी हे सूत्र कधीही जमलेलं नाही, असे म्हणत नरहरी झिरवाळ यांनी त्यांच्या वक्तव्यावर सारवासारव केली.
इतर महत्त्वाच्या बातम्या