(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Uday Samant: शिवसेना भवनात फ्रँकी खाल्ली, नेत्यांशी गप्पा मारल्या अन् शिंदेंना साथ देण्यासाठी सुरतला गेलो; उदय सामंतांनी सांगितला किस्सा
Maharashtra Politics: 20 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध बंडाचे निशाण फडकावले होते. एकनाथ शिंदे आपल्या गटाच्या आमदारांना घेऊन सुरतला गेले होते. उदय सामंत काही दिवस मुंबईतच थांबून होते.
मुंबई: महाराष्ट्रातील राजकारणात उलथापालथ घडवून आणणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या काळातील किस्से आणि घटना आजही चर्चेत असतात. सध्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार असल्याने एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या अन्य नेत्यांकडून ठाकरे गटाला लक्ष्य करण्यासाठी बंडाच्या काळातील घडामोडींचा संदर्भ दिला जात आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) हेदेखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरतला गेले होते. त्यावेळी नेमके काय घडले, याचा वृत्तांत सामंत यांनी एका मराठी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितला.
त्यावेळी शिवसेनेत प्रचंड नाराजी असल्यामुळेच एकनाथ शिंदे यांना आमदारांचा मोठ्याप्रमाणावर पाठिंबा मिळाला. मीदेखील एकनाथ शिंदे यांना साथ दिली. परंतु, मी शिवसेनेच्या अन्य नेत्यांना तशी पूर्वकल्पना देऊन हे पाऊल उचलले होते, असा खुलासा उदय सामंत यांनी केला. सुरतला जाण्यापूर्वी मी शिवसेना भवनात गेलो होतो. त्याठिकाणी असणाऱ्या नेत्यांसोबत मी बोललो, त्यांच्यासोबत मी शिवसेना भवनात बसूनच फ्रँकी खाल्ली. यादरम्यान मी संबंधित नेत्यांना मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात असल्याचे स्पष्टपणे सांगितले. त्यानंतर मला कोणीही अडवले नाही. खाली उतरुन मी गाडीत बसून सूरतच्या दिशेने रवाना झालो, असे उदय सामंत यांनी सांगितले. त्यावेळी मला उद्धव ठाकरे यांना भेटून हे सगळे सांगायचे होते. पण उद्धव ठाकरे आणि माझी भेट होऊ शकली नाही. मी 11 वर्षे शिवसेनेत होतो. सहा-सहा महिने उद्धव ठाकरे आम्हाला भेटत नसत, असे उदय सामंत यांनी म्हटले.
उद्धव ठाकरेंनी उदय सामंतांना काय ऑफर दिली होती?
उदय सामंत यांनी आपण एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात असल्याचे सांगितल्यानंतर ठाकरे गटाकडून त्यांना ऑफर देण्यात आली होती. मी शिंदे यांना साथ देऊ नये, असे माझे मन वळविण्याचे प्रयत्न झाले. एकनाथ शिंदे यांच्याकडील त्यावेळची नगरविकास आणि रस्ते विकास मंडळ ही दोन खाती देण्याची तयारी दर्शविण्यात आली होती. परंतु, मी त्याला ठामपणे नकार दिला. कारण मला ओसाडगावची पाटीलकी नको होती, असे उदय सामंत यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला 40 पेक्षा अधिक जागा मिळतील: उदय सामंत
उदय सामंत यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना 40 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळेल, असा दावा केला. पहिल्या दोन टप्प्यांमध्ये झालेले मतदानात महायुतीच्यादृष्टीने अनुकूल असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, ठाणे आणि मुंबईत उमेदवार जाहीर करण्यास उशीर झाला, ही बाब त्यांनी मान्य केली. ठाणे, नाशिक, दक्षिण मुंबई, वायव्य मुंबई या मतदारसंघांमध्ये आधी उमेदवार जाहीर झाले असते तर अधिक चांगले झाले असते, असे उदय सामंत यांनी म्हटले.
आणखी वाचा