(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मल्लिकार्जुन खर्गे यांची सुमारे सात तास ईडी चौकशी, काँग्रेसने केला निषेध
ED Questions Mallikarjun Kharge: नॅशनल हेराल्ड प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची सुमारे सात तास चौकशी केली.
ED Questions Mallikarjun Kharge: नॅशनल हेराल्ड प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची सुमारे सात तास चौकशी केली. काँग्रेसने याचा निषेध केला आहे. दुपारी 1.30 वाजता खर्गे यांची चौकशी सुरू झाली होती, ती रात्री 8.30 पर्यंत चालली. राजकीय सूडबुद्धीचा हा कळस असल्याचे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने मल्लिकार्जुन खर्गे यांची यंग इंडियाचे माजी कर्मचारी, पगार आणि व्यावसायिक गतिविधी बद्दल चौकशी केली.
यापूर्वी गुरुवारी ईडीने हेराल्ड हाऊस इमारतीतील यंग इंडियाच्या कार्यालयाची झडती घेतली होती. यादरम्यान, ईडीने कंपनीच्या व्यावसायिक गतिविधी, वित्त आणि कामकाजाशी संबंधित कागदपत्रांची तपासणी केली. याआधी बुधवारी ईडीने यंग इंडियाचे कार्यालय सील केले होते. ईडीने सांगितले की, काँग्रेस नेत्यांनी तपासात सहकार्य केले नाही. त्यानंतर कार्यालय सील करावे लागले. या प्रकरणी ईडीने खर्गे यांना समन्स बजावले होते आणि आज त्यासंदर्भात चौकशी करण्यात आली.
मल्लिकार्जुन खर्गे यांनी बुधवारी राज्यसभेत सांगितले होते की, त्यांना ईडीने समन्स बजावले आहे. त्यांना कायद्याचे पालन करायचे आहे, पण संसदेचे अधिवेशन सुरू असताना त्याला बोलावणे योग्य आहे का? सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या निवासस्थानांचा पोलिसांनी घेराव करणे योग्य आहे का?
काँग्रेस खर्गे यांच्या पाठीशी : जयराम रमेश
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्वीट केले की, मल्लिकार्जुन खर्गे हे आज संध्याकाळी 7:30 वाजता विरोधी पक्षाच्या उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवारासाठी डिनरचे आयोजन करणार होते. मात्र त्यांची अद्यापही ईडी चौकशी सुरू आहे. मोदी सरकारच्या राजकीय सूडबुद्धीचा हा कळस आहे. तत्पूर्वी दुसर्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांची ईडी अनेक तास चौकशी करत आहे. संपूर्ण काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी उभा आहे.
यावरच बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी खर्गे यांना बजावलेल्या समन्सवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की, लोकशाहीच्या इतिहासात असे कधीच घडले नाही की, संसदेचे कामकाज चालू असताना विरोधी पक्षनेत्याला ईडी किंवा इतर कोणत्याही तपास यंत्रणेने चौकशीसाठी बोलावले असेल. जर खर्गे यांना चौकशीसाठी बोलवाचे होते तर त्यांनी सकाळी 11 वाजण्यापूर्वी किंवा संध्याकाळी 5 नंतर बोलवायला हवे होते.