बनावट कुणबी प्रमाणपत्र रद्द करा, वंचित बहुजनची बॅनरबाजी, प्रकाश आंबेडकरांची आरक्षण बचाओ यात्रा आज छत्रपती संभाजीनगरमध्ये
वंचित बहुजनचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आज छत्रपती संभाजीनगर शहरात येणार आहेत. यावेळी शहरात वंचित बहुजनकडून ठिकठिकाणी बॅनर्स झळकवण्यात आले आहेत.
Chhatrapati Sambhajinagar: राज्यभरात वाटप करण्यात आलेले 55 लाख बनावट कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे, असे होर्डिंग छत्रपती संभाजीनगर शहरात ठिकठिकाणी वंचित बहुजन आघाडीकडून लावण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची आरक्षण बचाओ यात्रा आज संभाजीनगरमध्ये दाखल होणार आहे. तसेच शहरातील आमखास मैदानावर जाहीर सभा घेऊन ही यात्रेचे समारोप केला जाणार आहे.
मात्र, त्यापूर्वी छत्रपती संभाजीनगर शहरातील चौकाचौकात वंचित बहुजन आघाडीकडून होर्डिंग लावण्यात आले आहे आहेत.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा- ओबीसी आरक्षण प्रश्न तापलेला असताना प्रकाश आंबेडकरांनी ओबीसी आरक्षणासाठी आरक्षण बचाओ यात्रा सुरु केली होती. काल मनोज जरांगेंच्या होमग्राऊंडवर झाल्यानंतर आज या यात्रेसाठी वंचित बहुजनचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आज छत्रपती संभाजीनगर शहरात येणार आहेत. यावेळी शहरात वंचित बहुजनकडून ठिकठिकाणी बॅनर्स झळकवण्यात आले आहेत. ज्यात कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे,100 ओबीसी आमदार निवडून आणणार, तसेच सरंजामी मराठा पक्षांच्या हातातील बाहुली असणाऱ्यांना मतदान करणार नाही असा उल्लेख या बॅनरवर पाहायला मिळतोय.
वंचित बहूजनकडून बॅनरबाजी
एससी एसटी यांच्यासाठी 54 आरक्षित जागांवर आम्ही ओबीसी समूह आरक्षणवाद्यांनाच मत देणार! सरंजामी मराठा पक्षांच्या हातातील बाहुली असणाऱ्यांना मदत करणार नाही. हो आम्ही 54 आरक्षित जागांवर आरक्षणवाद्यांनाच मत देणार!!! अशा मजकुराचे बॅनर शहरात ठिकठिकाणी लागले असून शहरात ओबीसी यात्रेसाठी वंचित कडून जोरदार तयारी सुरू आहे.
एकाही मराठा उमेदवाराला मतदान करायचं नाही
गेल्या काही दिवसांपासून प्रकाश आंबेडकर राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढत असून मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला कडाडून विरोध ते करत आहेत. यावेळी एकाही कुणबी मराठा उमेदवाराला मतदान करायचं नाही. असं वक्तव्य त्यांनी अमरावती वाशीम जिल्ह्याच्या दौऱ्यात केलं होतं.