''भाजप आमदाराने आता मिशी कापावी''; पतीवरील टीकेला पत्नीचं उत्तर, काँग्रेस खासदारांचा पलटवार
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी मिळवल्यापासून प्रतिभा धानोरकर आणि भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्यात चांगलीच खडाजंगी पाहायाल मिळाली.
यवतमाळ : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अनेक रंजक गोष्टी पाहायला मिळाल्या, एकमेकांवर टीका-टिपण्णी करताना नेतेमंडळीची भाषा बिघडली होतीच, याशिवाय एकमेकांना आव्हानंही देण्यात आल्याचं दिसून आलं. पश्चिम महाराष्ट्रातील काही मतदारसंघात नेतेमंडळींच्या जय-पराजयावरुन शर्यती लागल्या होत्या. तर, विदर्भातील चंद्रपूर (Chandrapaur) लोकसभा मतदारसंघातही एका भाजप (BJP) उमेदवारांच्या प्रचारादरम्यान आमदार संदीप धुर्वे यांनी असंच काहीसं वक्तव्य केलं होतं. दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्यावर मतदारसंघात एकही काम केले नाही, त्यांनी केलेलं काम दाखवा अर्धी मिशी कापून टाकतो, असे विधान केले होते. त्यावरुन, आता नव्याने खासदार झालेल्या दिवंगत बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांनी आमदार सुर्वेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. तसेच, आमदार धुर्वेंनी आता मिशी कापावी, असेही त्यांनी म्हटले.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी मिळवल्यापासून प्रतिभा धानोरकर आणि भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्यात चांगलीच खडाजंगी पाहायाल मिळाली. त्यातच, यवतमाळचे भाजपचे आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांना थेट आव्हान देत घणाघाती टीका केली होती. चंद्रपुर लोकसभा मतदारसंघातील दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांनी खासदार निधीतून यवतमाळच्या आर्णी, घाटंजी, पांढरकवडा येथे केलेली एक कोटींची कामे दाखविल्यास आपण आपली अर्धी मिशी कापू, असे थेट आव्हान आमदार डॉ संदीप धुर्वे यांनी प्रतिभा धानोरकरांना दिले होते. आता, निवडणूक निकालानंतर खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आमदार संदीप धुर्वेनी मिशी कापावी, असे म्हटले आहे.
काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर ह्या महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या नखाचीही बरोबरी करू शकत नाही. अशी बोचरी टीका धुर्वे यांनी केली होती. चंद्रपूर येथे आयोजित भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत धुर्वे यांनी प्रतिभा धानोरकर यांना लक्ष्य केले होते. त्यावरुन, आज चंद्रपूर-आर्णी लोकसभा मतदार संघाच्या नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आर्णी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. संदीप धुर्वे यांचा चांगलाच समाचार घेतला.
प्रतिभा धानोरकर काय म्हणाल्या
लोकसभा प्राचारावेळी अरणीचे आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्यावर मतदारसंघात एकही काम केले नाही, काम दाखवा अर्धी मिशी कापून टाकतो, असे विधान केले होते. या टीकेला उत्तर देताना खासदार धानोरकर यांनी आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी पाच वर्षात एकदाही विधानसभेत मतदार संघाचा प्रश्न विचारला नाही. केवळ मिशीला आट मारण्यापलीकडे काम नव्हतं. लोकसभा निवडणुकीत आर्णी मतदारसंघात लीड मिळणार असल्याचा दावा प्रतिभा धानोरकर यांनी केला होता. आता या विधानसभा मतदारसंघात लीड मिळाली आहे, त्यामुळे आमदार धुर्वे यांनी मिशी काढून टाकावी म्हणजे त्यांना दुसरे काम राहणार नाही, असा टोलाच खासदार धानोरकर यांनी लगावला आहे.
काय म्हणाले होते आमदार धुर्वे
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील माजी दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांनी खासदार निधीतून यवतमाळच्या आर्णी, घाटंजी पांढरकवडा येथे केलेली एक कोटींची कामे केल्याचे दाखवा, मी आपली अर्धी मिशी कापेल, असे माझे थेट आव्हान आहे. त्यामुळे यावेळी या मतदारसंघात भाजपच्या वतीने सुधीर मुनगंटीवार सारखा विकासपुरुष या मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून दिला आहे. त्यामुळे प्रत्येकाला प्रचंड मेहनत करून त्यांना मोठ्या मताधिक्याने आगामी निवडणुकीमध्ये विजयी करण्याचा संकल्प आपण प्रत्येकाने केला पाहिजे, असे आवाहन देखील आमदार डॉ संदीप धुर्वे यांनी बोलताना केलंय. त्यामुळे आमदार धुर्वे यांनी केलेले टीकेला काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर या कशा पद्धतीने प्रत्युत्तर देतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.