आधी म्हणाले अमित शाहांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश, पण प्लॅन अचानक बदलला; अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाची इतकी घाई का?
Ashok Chavan: अशोक चव्हाण यांनी पुढील दोन दिवसांमध्ये पुढील भूमिका स्पष्ट करेन, असे म्हटले होते. परंतु, आता अशोक चव्हाण दुसऱ्याच दिवशी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
![आधी म्हणाले अमित शाहांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश, पण प्लॅन अचानक बदलला; अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाची इतकी घाई का? Ashok Chavan will join BJP Today for Rajya Sabha Election 2024 आधी म्हणाले अमित शाहांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश, पण प्लॅन अचानक बदलला; अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाची इतकी घाई का?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/13/a6b68cf5eab24b6965ce1d4f5ee97b1e1707795667482954_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे माजी ज्येष्ठ मंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. यानंतर अशोक चव्हाण यांनी मी येत्या दोन दिवसांमध्ये पुढील दिशा जाहीर करेन, असे सांगितले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतील, असे सांगितले जात होते. मात्र, आज दुसऱ्याच दिवशी अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या उपस्थितीत दुपारी साडेबारा वाजता चव्हाण हे भाजपच्या (BJP) प्रदेश कार्यालयामध्ये पक्षप्रवेश करतील.
अशोक चव्हाण यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आपली भूमिका सविस्तरपणे मांडली होती. मी इतकी वर्षे काँग्रेसमध्ये प्रामाणिकपणे काम केले. आता मला वेगळा पर्याय शोधावासा वाटत आहे, असे चव्हाण यांनी म्हटले होते. त्यानंतर अशोक चव्हाण यांनी पुढील दोन दिवसांमध्ये पुढील भूमिका स्पष्ट करेन, असे म्हटले होते. परंतु, आता अशोक चव्हाण दुसऱ्याच दिवशी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्या भाजप प्रवेशाच्या घाईमागे राज्यसभा निवडणुकीचे गणित असल्याचे सांगितले जात आहे. अशोक चव्हाण यांना भाजपकडून राज्यसभेवर पाठवले जाणार आहे. चव्हाण यांच्या पक्षप्रवेशानंतर आजच भाजपकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर केली जाऊ शकते. त्यामध्ये अशोक चव्हाण यांचे नाव असण्याची शक्यता आहे. त्यासाठीच अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेसच्या पक्षसदस्यत्त्व आणि आमदारकीचा राजीनामा दिला. चव्हाण यांना १५ फेब्रुवारीलाही भाजपमध्ये प्रवेश करणे शक्य होते. मात्र, यामुळे राज्यसभेच्या उमदेवारी दाखल करताना अडचण झाली असती. त्यामुळे भाजपकडून आजच अशोक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशाचा सोहळा उरकण्यात येणार असल्याचे समजते.
काँग्रेसचे आणखी आमदार भाजपमध्ये जाणार?
अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे माजी आमदार अमर राजूरकर हेदेखील आजच भाजपचा झेंडा खांद्यावर घेतील. तर अशोक चव्हाण गटाचे उर्वरित आमदार नंतरच्या टप्प्यात भाजपमध्ये प्रवेश करतील, असे सांगितले जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या नेत्यांना भाजपमध्ये आणण्याची रणनीती अगोदरच ठरवण्यात आली होती. मात्र, हे करताना अचूक राजकीय टायमिंग साधले जाईल, याची काळजी भाजपकडून घेतली जात आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)