Arvind Kejriwal PC : चलनी नोटेवर महात्मा गांधी यांच्यासोबतच गणेश आणि लक्ष्मी यांच्या प्रतिमा मुद्रित करा : अरविंद केजरीवाल
Arvind Kejriwal PC :भारतीय चलनी नोटांवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासोबतच श्रीगणेश आणि लक्ष्मी यांच्या प्रतिमा मुद्रित कराव्यात, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.
Arvind Kejriwal PC : आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी केंद्र सरकारला महत्त्वाची सूचना केली आहे. भारतीय चलनी नोटांवर (Currency Note) राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्यासोबतच श्रीगणेश (Ganesh) आणि लक्ष्मी (Laxmi) यांच्या प्रतिमा मुद्रित कराव्यात, अशी मागणी केजरीवाल यांनी केली आहे. दिल्लीतील पत्रकार परिषदेत अरविंद केजरीवाल बोलत होते.
अरविंद केजरीवाल म्हणाले की, "एकीकडे देशाचं चलन कमकुवत होत आहे तर अर्थव्यवस्थाही दोलायमान परिस्थितीत आहे. आपण जेव्हा संकटात असतो तेव्हा ईश्वराची आठवण होते. आपण दिपावलीला लक्ष्मीपूजन केलं. यावेळी आपण लक्ष्मी आणि गणपतीची पूजा केली. अत्यंत गंभीर परिस्थितीतही आपण देवावर विश्वास ठेवतो. अशा परिस्थितीत माझं आवाहन आहे की, भारतीय चलनावर राष्ट्रपिता महात्मा गांधी, श्री लक्ष्मी आणि श्री गणेश यांचे फोटो छापावेत." यावेळी केजरीवाल म्हणाले की, "नोटेवर गांधीजींचा फोटो तसाच ठेवावा, पण मागच्या बाजूला देवांचा फोटो लावावा."
'लक्ष्मीपूजनाला माझ्या मनात विचार आला'
अरविंद केजरीवाल यांनी आज (26 ऑक्टोबर) दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. लक्ष्मीपूजनाला रात्री पूजा करताना माझ्या मनात हा विचार आल्याचं केजरीवाल यांनी सांगितलं. मी अनेक लोकांशी चर्चा केली, यावर कोणालाही आक्षेप असेल असं वाटत नाही, असं ते म्हणाले. तसंच डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत असल्याचा उल्लेख करताना केजरीवाल म्हणाले की देवाचा आशीर्वाद असला की प्रयत्नांना यश येतं.
केजरीवाल यांच्याकडून इंडोनेशियाचं उदाहण
केजरीवाल म्हणाले की, "आता जेवढ्या नव्या नोटा आल्या त्यावर लक्ष्मी आणि गणेश यांच्या प्रतिमा मुद्रित कराव्यात. यासाठी त्यांनी इंडोनेशियाचं उदाहरण देखील दिलं. सर्व नोटा बदला असं माझं म्हणणं नाही. पण जेवढ्या नव्या नोटा छापल्या जात आहे, त्यावरुन सुरुवात केली जाऊ शकते. हळूहळू नव्या नोटा चलनात येतील. इंडोनेशिया मुस्लीम देश आहे. तिथे 85 टक्के मुस्लीम आहेत, 2 टक्क्यांपेक्षाही कमी हिंदूंची संख्या आहे. तरीही त्यांनी आपल्या चलनी नोटांवर श्रीगणेशाची प्रतिमा छापली आहे. हे अतिशय महत्त्वाचं पाऊल आहे, जे केंद्र सरकारला उचलायला हवं. मी 130 कोटी जनतेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन करतो की, भारतीय चलनी नोटांवर श्रीलक्ष्मी आणि श्रीगणेश यांच्या प्रतिमा मुद्रित केल्या जाव्यात."