Amit Shah: एकनाथ शिंदे मनासारख्या जागा पदरात पाडून घेणार? अमित शाहांसोबतच्या बैठकीत डिटेल प्लॅन सांगितला, नेमकं काय घडलं?
Mahayuti seat sharing: एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांना विधानसभेच्या ज्या जागा हव्या आहेत, त्याविषयी सविस्तर कारणे आणि माहिती दिली. अमित शाह एकनाथ शिंदेंच्या मागण्या मान्य करणार का?
मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीसाठीच्या महायुतीच्या जागावाटपाबाबत मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर नुकतीच एक महत्त्वाची बैठक पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यात या बैठकीत मंगळवारी रात्री जागावाटपाबाबत सविस्तर चर्चा झाली. या चर्चेनंतर महायुतीच्या जागावाटपाचा (Mahayuti seat sharing) तिढा सुटण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या चर्चेनंतर एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) त्यांना हव्या असलेल्या मोजक्या जागा पदरात पाडून घेण्यात यशस्वी ठरणार का, याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.
काल रात्री उशिरा सह्याद्री अतिथी गृहावर अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यात महायुतीचंच सरकार आणू, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांना दिल्याचं समजते. लोकसभा निवडणुकीप्रमाणे जागावाटप करायला आणि उमेदवारांची नावे घोषित करायला उशीर करायला कामा नये, अशी विनंती एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांना केली. तसेच जागावाटप लवकरच जाहीर करायला हवे, अशी मागणीही एकनाथ शिंदे यांनी केली.
अमित शाहांसमोर शिंदेंनी सविस्तर प्लॅन मांडला
एकनाथ शिंदे यांनी त्यांना अपेक्षित असलेल्या जागा आणि त्या जागा का हव्या आहेत, याबाबत सविस्तर माहिती अमित शहा यांना दिली. शासनाने राबवलेल्या लाडकी बहीण योजना आणि इतर योजना या लोकांपर्यंत उत्तमरित्या पोहोचले आहेत. यावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं असल्याचं एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांना सांगितले. जागावाटपाच्या विषयावर आपण सर्व समन्वयाने मार्ग काढू, अशी अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ग्वाही दिल्याचे समजते. महायुतीमध्ये विसंवाद आहे, अशी भावना लोकांसमोर येऊन देऊ नका. आपापसातील मतभेद विसरून कुटुंबाप्रमाणे महायुती म्हणून एकत्र या आणि एकत्र लढा, असा सल्ला अमित शाहांनी शिंदे यांना दिला.
कुडाळ मतदारसंघासाठी नारायण राणे शिंदेंना भेटले
भाजपचे खासदार नारायण राणे यांनी बुधवारी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी उभयतांमध्ये कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. माजी खासदार निलेश राणे हे या मतदार संघातून इच्छूक आहेत. त्यामुळे या मतदारसंघाबाबत नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा केल्याची माहिती आहे. निलेश राणे यांना शिवसेनेच्या तिकिटावर की भाजपच्या तिकीटावर लढवायचे, याचा निर्णय लवकरच होणार आहे.
आणखी वाचा
मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!