(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jayant Patil: अजित पवार बारामतीतूनच लढतील, पण सत्ता मविआची येणार; पाटलांनी सांगितलं किती जागा जिंकणार?
Jayant Patil: शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने जयंत पाटील यांनी आपल्या भाषणातून अजित पवारांना लक्ष्य केलं
Jayant Patil: गोंदिया : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये भाषण करताना विधानसभा निवडणुकांबाबत आश्चर्यजनक वक्तव्य केलं होतं. अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर सर्वत्र चर्चा सुरू झाली असून यंदा बारामतीतील विधानसभा निवडणूक कोण लढणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. आता, महायुतीकडून बारामतीची जागा अजित पवारच लढतील, असा दावा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. मात्र, राज्यात विधानसभा निवडणुकांनंतर महाविकास आघाडीचीच सत्ता येणार असल्याचेही ते म्हणाले. राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून सर्वच राजकीय पक्ष आपल्या परीने प्रचार करत आहेत. राजकीय यात्रा आणि दौऱ्यांच्या माध्यमातून ते जनतेपर्यंत पोहोचत आहेत. जयंत पाटील आज गोंदिया दौऱ्यावर असताना त्यांनी संवाद साधला. त्यावेळी, सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना बारामतीच्या जागेवरही त्यांनी भूमिका स्पष्ट केली.
शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने जयंत पाटील यांनी आपल्या भाषणातून अजित पवारांना लक्ष्य केलं. मी शरद पवारांना सोडून चूक केली असे वक्तव्य अजित पवारांनी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता, केले होते. त्यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, अजित पवारांनी काय बोलायचं यासाठी त्यांच्याकडे कन्सल्टंट आहेत, आणि कन्सल्टंट काय सांगतात त्यानुसार ते बोलत असतात. ते स्वतःच्या बुद्धीने आणि स्वतःच्या इच्छेने ते बोलत नाहीत, त्यांचे कन्सल्टंट जे सांगतात त्यानुसार बोलतात, असा खोचक टोला त्यांनी लगावला.
विधानसभेमध्ये 175 जागा मिळतील : जयंत पाटील
राज्यात होत असलेल्या आगामी विधानसभा निवडणूक सर्व्हेमध्ये महाविकास आघाडीला 155जागा मिळत असल्याचा अंदाज आहे. त्यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की ह्या जागा वाढून 175 पर्यंत जागा आम्हाला मिळतील. तर, अजित पवार हे बारामतीमधूनच विधानसभेची निवडणूक लढतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नागपूर पोलिसांनी योग्य तपास करावा - पाटील
नागपूर अपघात प्रकरणांमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या गाडीने अपघात केला, याविषयी बोलण्यासाठी महायुतीचे नेते टाळाटाळ करीत आहेत. याबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले, आता याबाबतीत खराखुरा तपास पोलिसांनी करावा, सर्व सीसीटीव्ही तपासावे आणि त्यानंतरच आम्ही योग्यवेळी बोलू.
तिरोडा विधानसभेतील विरोधी पक्ष घाबरला
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची शिव-स्वराज यात्रा तिरोडा येथे येणार होती. परंतु त्यापूर्वीच काही अज्ञात व्यक्तींनी त्यांचे पोस्टर फाडले होते. या विधानसभा क्षेत्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मोठे अस्तित्व आहे. त्यामुळे येथील विरोधी लोक घाबरलेले आहेत आणि आमच्या पक्ष या ठिकाणी वाढतो त्यामुळे काही लोकांनी आमचे पोस्टर फाडले असतील, त्यांच्या मी निषेध करतो असेही जयंत पाटील यांनी म्हटले.
न्या. चंद्रचूड योग्य तो निर्णय घेतील
न्यायमूर्ती चंद्रचूड हे आता निवृत्त होणार आहेत, परंतु त्यांच्या काळातच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचे दोन गट झाले होते. याबाबत अद्यापही निर्णय झाला नाही, यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, माननीय न्यायमूर्ती चंद्रचूड हे निवृत्तीपूर्वी याबाबत योग्य तो निर्णय घेतील.