Maharashtra: पालघरच्या ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा; रुग्णालयात खाटांची संख्या अपुरी
Palghar News: पालघरच्या विक्रमगड तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात केवळ 30 खाटा असल्याने रुग्णांची परवड होत आहे, शासनाला 20 अतिरिक्त खाटांची मागणी केली असता अद्याप त्याची पूर्तता झालेली नाही.
Maharashtra: पालघर जिल्ह्यात आरोग्य व्यवस्थेचा उडालेला बोजवारा हा आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो. सध्या याच पालघर जिल्ह्यातील विक्रमगड या दुर्गम तालुक्यातील लाखो नागरिकांना 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयावर अवलंबून राहावं लागत असून ही आरोग्य व्यवस्था विक्रमगडकरांसाठी तोकडी पडत असल्याने येथील स्थानिकांकडून या रुग्णालयाच्या खाटांची क्षमता वाढवण्याची मागणी वारंवार केली जात आहे. सध्या या ग्रामीण रुग्णालयात 20 खाटा वाढवण्याचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित असून यावर तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी येथील स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
विक्रमगड हा पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम असा तालुका आहे, या तालुक्याची लोकसंख्या आता जवळपास दीड लाखांच्या घरात पोहोचली आहे. मात्र येथील दळणवळणाच्या सुविधांचा अभाव आणि अजूनही अविकसित असा परिसर यामुळे येथे फारशी खाजगी रुग्णालयं पाहायला मिळत नाहीत. त्यामुळे या तालुक्यातील जवळपास दीड लाख नागरिकांना विक्रमगड ग्रामीण रुग्णालयावर अवलंबून राहावं लागत आहे. विक्रमगड ग्रामीण रुग्णालयात तालुक्यातील तीनशे ते साडेतीनशे रुग्ण रोज उपचार घेण्यासाठी येतात, यात अनेक गर्भवती मातांचा देखील समावेश असतो. मात्र, विक्रमगड ग्रामीण रुग्णालय हे अवघे 30 खाटांचे असल्याने येथील नागरिकांना उपचारासाठी इतरत्र धाव घ्यावी लागते. त्यामुळे उपचारासाठी होणारी आमची परवड कधी थांबणार? असा सवाल येथील स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.
सध्या विक्रमगड ग्रामीण रुग्णालयात 30 खाटा उपलब्ध असून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या 25 पैकी 16 जागा भरलेल्या, तर 9 जागा रिक्त आहेत. त्यामुळे या रुग्णालयातील आरोग्य सेवा आणि खाटा येथे येणाऱ्या रुग्णांच्या सेवेसाठी अपुऱ्या पडत असल्याने मागील अनेक वर्षांपासून रुग्णालयात आणखी 20 खाटांची क्षमता वाढवण्यात यावी, अशी मागणी पालघर आरोग्य विभागाकडून शासनाकडे केली जात आहे. मात्र, हा ठराव अजूनही शासनाकडे प्रलंबित असल्याने येथील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची उपचारासाठी मोठी हेळसांड झालेली पाहायला मिळते.
विक्रमगड ग्रामीण रुग्णालय हे 30 खाटांवरून 50 खाटांचं करण्यासाठी या रुग्णालयात अतिरिक्त बांधकाम देखील पूर्ण करण्यात आलं आहे. मात्र, अजूनही 20 खाटा आणि सोयीसुविधा या रुग्णालयाला मिळत नाहीत. या संदर्भात आरोग्य विभागाकडून शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचा दावा पालघरचे शल्य चिकित्सक डॉक्टर बोधाडे यांनी केला आहे.
पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड या परिसरात आरोग्य व्यवस्था आजही सक्षम झालेली पाहायला मिळत नाही, त्यामुळे येथील रुग्णांना उपचारासाठी इतर बड्या शहरांचा किंवा दादरा नगर हवेली मधील सेलवासा येथील रुग्णालयांचा आसरा घ्यावा लागतो. एका बाजूला देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना दुसऱ्या बाजूला मात्र मुंबई, ठाणे या महानगरांलगत असलेल्या पालघर जिल्ह्यात उपचारासाठी रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची होणारी परवड कधी थांबणार? हाच खरा प्रश्न आहे.
हेही वाचा: