Buldhana : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर उद्घाटनापूर्वीच भरधाव वाहतूक, बुलढाण्याजवळ रात्री झालेल्या अपघातात एक ठार तर दोघे गंभीर जखमी
समृद्धी महामार्गाचे काम लवकरच पूर्णत्वाकडे जाणार आहे. त्यामुळे या महामार्गावरून सुसाट वाहने घेऊन जाणे हे धोकादायक आहे. नागरिकांनी प्रवास करू नये असं आवाहन "एबीपी माझा "कडून करण्यात येत आहे
बुलढाणाः समृद्धी महामार्ग सुरू होण्यापूर्वीच आता महामार्गावरून वाहतूक सुरू असल्याने अपघात होण्यास सुरुवात झाली आहे. रविवारी सायंकाळी मेहकर येथील काही व्यावसायिक औरंगाबाद येथून समृद्धी महामार्गाने मेहकर कडे येताना अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. पावसामुळे तांदुळवाडी शिवारात भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार महामार्गावरील डिवाइडरच्या खड्ड्यात पलटून अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, कार ने तीन ते चार वेळा पलटी घेऊन खड्डयात अडकली. या अपघातात मेहकर येथील व्यावसायिक बळीराम खोकले हे जागीच ठार झाले. तर, इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात कारचा चुराडा झाला आहे. जखमींवर जालना येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. समृद्धी महामार्गाचे काम अजूनही सुरू असून यावरून वाहतूक सुरू कशी? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
महामार्गावर अनेक ठिकाणी काम सुरूच
समृद्धी महामार्गाचं लोकार्पण दोनदा पुढे ढकलण्यात आले आहे. याचं मुख्य कारण म्हणजे अजूनही समृद्धी महामार्गचं काम हे अनेक ठिकाणी अपूर्ण आहे. वाशीम जिल्ह्यात दोन ठिकाणी मोठ्या पुलाच काम सुरू असून बुलढान्यात खडकपूर्णा नदीवरील पुलाच काम सुरू आहे. अनेक ठिकाणी छोटे मोठे तुकडे जोडण्यात येत असल्याने या महामार्गावरून वाहतूक करणे धोकादायक आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर व देऊळगाव राजा येथील महामार्गावरील एन्ट्री पॉइंट्सवर कुणाचंही निर्बंध नसल्याने नागरिक आपली वाहने समृद्धी महामार्गावर घेऊन जातात. या मार्गावरून नागपूरच्या दिशेने किंवा औरंगाबाद, शिर्डीकडे प्रवास करतात. महामार्गावर सध्या वाहने कमी असल्याने वाहनचालक सुसाट वेगाने आपली 'टेस्ट ड्राईव्ह' या मार्गावर घेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महामार्गावर अपघात होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसात या परिसरात महामार्गावर छोटे मोठे चार अपघात घडले असून आता यावर निर्बंध घालणे गरजेचे असल्याची मागणी होत आहे.
वाहतूक करणे धोकादायकच
हा महामार्ग लवकरच पूर्णत्वाकडे जाणार असला तरी देखील अजून तांत्रिक तपासणी नंतरच या मार्गावरून वाहतुकीची परवानगी दिली जाणार आहे. त्यामुळे या महामार्गावरून सुसाट वाहने घेऊन जाणे हे धोकादायक असल्याने यावरून नागरिकांनी प्रवास करू नये असं आवाहन "एबीपी माझा "कडून करण्यात येत आहे , संबंधित विभागाचे अधिकारी यावर बंधन घालतील अशी अपेक्षा करूयात.