Israel Iran Conflict : अखेर भारताकडून खामेनींच्या मृत्यूवर शोकसंदेश जारी, इराणच्या दूतावासात जाऊन हस्ताक्षर
India On Ayatollah Ali Khamenei Death : इराण-इस्त्रायल युद्धादरम्यान पश्चिम आशियामध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचंही भारताने जाहीर केलं आहे.

नवी दिल्ली : इराणचे सर्वोच्च नेते अय्यातुल्ला खामेनी (Ayatollah Ali Khamenei) यांच्या मृत्यूनंतर भारताने त्याचा निषेध केला नाही किंवा त्यावर कोणतंही भाष्य केलं नाही, त्यावरून अनेकदा प्रश्न उपस्थित केले जात होते. काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी भारताच्या परराष्ट्र धोरणावर टीका केली होती. त्यानंतर आता भारताने अधिकृतरित्या खामेनींच्या मृत्यूवर शोकसंदेश जारी केला. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी नवी दिल्लीतील इराणच्या दूतावासात जाऊन शोकपुस्तिकेवर स्वाक्षरी केली आणि इराणचे मृत सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना श्रद्धांजली वाहिली.
इस्त्रायल आणि अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यामध्ये सर्वोच्च नेते अय्यातुल्ला खामेनी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर खामेनी यांच्या मृत्यूनंतर त्यावर जगभरातून प्रतिक्रिया आली. असं असतानाही भारताने त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती, किंवा भाष्य करणं टाळलं. त्याचवेळी इराणने सौदी अरबमधील अमेरिकन तळावर हल्ला केल्यानंतर मात्र भारताने त्याचा निषेध केल्याचं दिसून आलं.
#WATCH | Foreign Secretary Vikram Misri, on behalf of Government of India, signed the Condolence Book at the Embassy of Iran in New Delhi today, and offered condolences to the slain Supreme Leader of Iran Ayatollah Ali Khamenei. pic.twitter.com/A3IP2d0diX
— ANI (@ANI) March 5, 2026
Israel Iran Conflict : काँग्रेससह विरोधी पक्षांची टीका
नरेंद्र मोदी सरकारच्या या धोरणावर काँग्रेससह विरोधी पक्षांनी टीका केली. कोणतेही युद्ध घोषित न करता अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर हल्ला केला आणि त्यामध्ये खामेनींचा मृत्यू झाला. इराण आपला जुना मित्र असतानाही खामेनी यांच्या मृत्यूवर भारताने साधा शोकसंदेश जारी केला नाही, भारताची ही भूमिका निंदाजनक असल्याचं सोनिया गांधी यांनी त्यांच्या पत्रातून म्हटलं होतं.
आता मात्र भारताने उशीरा का होईना खामेनी यांच्या मृत्यूवर शोकसंदेश दिला. देशाचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी नवी दिल्लीतील इराणच्या दूतावासात जाऊन शोकसंदेशावर हस्ताक्षर केले.
इराणच्या खामेनींच्या मृत्यूनंतर त्यावर पाकिस्तानच्या संसदेत श्रद्धांजली वाहण्यात आली. त्याचवेळी चीन आणि रशियाकडूनही या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला आणि अमेरिका-इस्त्रायलच्या भूमिकेवर टीका करण्यात आली होती.
चर्चेतून प्रश्न सोडवावा, भारताची भूमिका
दरम्यान, कोणताही मुद्दा हा लष्करी कारवाईच्या माध्यमातून सुटत नाही, दोन्ही बाजूंनी चर्चेच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवावा अशी भूमिका भारताने मांडली आहे. या युद्धादरम्यान पश्चिम आशियामध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचंही भारताने जाहीर केलं आहे.
ही बातमी वाचा:





















