(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nanded Rain : नायगावमध्ये मुसळधार तर उमरीमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, नागरिकांसह विद्यार्थ्यांचा पुराच्या पाण्यातून प्रवास
नांदेड (Nanded) जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. रस्त्याअभावी नायगाव तालुक्यातील नागरिकांचे हाल होत आहेत.
Nanded Rain : राज्याच्या विविध भागात पावसानं (Rain) पुन्हा हजेरी लावली आहे. पावसानं काही दिवस उघडीप दिली होती. मात्र, पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. नांदेड (Nanded) जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. रस्त्याअभावी नायगाव तालुक्यातील नागरिकांचे हाल होत आहेत. तालुक्यातील पळसगाव, ताकबीड, टाकळगाव येथील नागरिकांना गावालगत असलेल्या नाल्यावर पूल नसल्यानं विद्यार्थ्यांसह नागरिक आणि रुग्णांना जीव मुठीत धरुन पुराच्या पाण्यातूव वाट काढावी लागत आहे.
उमरी तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस
नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. बेलदरा, हातनी रस्ता बंद झाला आहे. उंची कमी असलेल्या पुलाला पूर आल्यानं शेकडो नागरिक अडकले आहेत. उमरी तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने बेलदरा, हातनी, येंडाळा, महाटी, कौडगाव जाणाऱ्या अरुंद व उंची कमी असलेल्या पुलावरून पाणी गेल्याने जवळपास 500 पेक्षा अधिक नागरिक चार तास पुराच्या पाण्यात अडकून पडले होते. दरम्यान, काही नागरिक नाहक धाडस दाखवत, पुराच्या पाण्यातून जोखमीचा प्रवास करत पूल ओलांडत आहेत. दरम्यान, आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळं उमरी तालुक्यातील रस्त्यांची मात्र दयनीय अवस्था झाली आहे. तर अरुंद रस्ते आणि पुलाची उंची कमी असल्यानं चांगला पाऊस झाला की पुलावरून पाणी वाहते आणि रस्ता बंद होतो. त्यातच आज झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळं बेलदरा, हातनी या मार्गावरील पुलाला अचानक पूर आल्याने रस्ता बंद झाला आहे. त्यामुळं अलीकडील आणि पलीकडच्या भागातील जवळपास 500 पेक्षा अधिक नागरीक, शेतकरी, शालेय विद्यार्थी अडकून पडले होते.
नायगाव तालुक्यातही जोरदार पाऊस
आठवडाभराच्या विश्रांतीनंतर नांदेड जिल्ह्यात पुन्हा पाऊस सुरु झाला आहे. जोरदार पावसामुळं नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात दाणादाण उडाली आहे. दरम्यान, नायगाव तालुक्यातील पळसगाव, ताकबीड, टाकळगाव येथील नागरिकांना गावालगत असणाऱ्या नाल्यामुळं रहदारीस अडथळा निर्माण होऊन अनेक वर्षापासून हाल सहन करावे लागत आहेत. नाल्यावर पूल नसल्यामुळं नाल्याला पूर आल्याने शाळकरी विद्यार्थ्यांना व गावातील रुग्णांना नाल्यातील पुरामधून जीव मुठीत धरुन दररोज प्रवास करावा लागत आहे. तर काल टाकळगाव येथील रुग्णास रुग्णालयात नेण्यासाठी खाटेवर घेऊन जाणाऱ्या नागरिकांना रुग्णासह पुरातून जीवघेणा प्रवास करावा लागला. दरम्यान, नायगाव तालुक्यापासून केवळ 20 किमी अंतरावर असणाऱ्या या गावांना, अनेक वर्षापासून प्राथमिक सुविधा अभावी हाल सहन करावा लागत आहे.
महत्त्वाच्या बातम्या: