Sharad Pawar : तुम्ही तीन वेळा शिवसेना फोडली, दीपक केसरकरांच्या आरोपावर शरद पवार म्हणतात...
Sharad Pawar : शरद पवार यांनी तीन वेळा शिवसेना फोडली, असा आरोप बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी केला होता. केसरकरांच्या या आरोपावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी नाराजी व्यक्त केली.
Sharad Pawar : शरद पवार यांनी तीन वेळा शिवसेना फोडली, असा आरोप बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी केला होता. केसरकरांच्या या आरोपावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. अजित पवार, जितेंद्र आव्हाड, अमोल मिटकरी यांच्यासह अनेक नेत्यांनी दीपक केसरकर यांच्यावर सडकून टीका केली. दीपक केसरकरांच्या आरोपावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच वक्तव्य केले आहे. शरद पवार आज नागपूरमध्ये होते, यावेळी त्यांनी आपल्यावरील आरोपाचं उत्तर दिलं. 'शरद पवारांनी शिवसेना तीनदा फोडली', या वक्तव्याला फारसं महत्व द्यावं असं हे वक्तव्य नाही, असे शरद पवार म्हणाले. ते नागपूरमध्ये बोलत होते.
केंद्र सरकारच्या निर्णायावर नाराजी -
संसद भवन परिसरात निदर्शनं, आंदोलनं, उपोषणं करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णायावर शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, सभागृहात मागणी मान्य झाली नाही तर लोग सभात्याग करतात, मग बाहेर महात्मा गांधींच्या पुतळ्यापाशी जाऊन शांतपणे निदर्शने करतात. केंद्र सरकारने शांतपणे आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार काढून घेतला आहे, उद्या आम्ही बैठकीत ह्यावर चर्चा करू आणि हा प्रश्न कसा उचलायचा ते ठरवू, असे शरद पवार म्हणाले.
पालिका निवडणूक महाविकास आघाडीने एकत्र लढवावी -
राज्यात होणाऱ्या महापालिका निवडणुका शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी एकत्रित लढवाव्यात. जर काँग्रेस, राष्ट्रवादी सेना एकत्र लढले तर लोकांना त्यांच्या मनासारखे मतदान करता येईल, असं मला वाटतं पण आम्हाला बैठका कराव्या लागतील, असे शरद पवार म्हणाले.
प्रशासन ठप्प -
राज्यात अनेक ठिकाणी सध्या पूर परिस्थिती आहे. प्रशासन ठप्प आहे. फक्त दोघंच जण आहेत, राज्यातील परिस्थिती बघता हे नुकसानदायक आहे, असे शरद पवार म्हणाले.
...तर मी अभिनंदन केले असते -
काही नवीन केले असते तर मी अभिनंदन केले असते, पण आधीचे निर्णय रद्द करणे आणि काहीतरी मोठे केले हे दाखवणे चुकीचं आहे, असे शरद पवार म्हणाले. बांठीया आयोगाचा अहवाल आला आहे म्हणे, पण त्यात काय आहे ते माहिती नाही, काही चुकीचे आहे ते बघावे लागेल, असेही पवार म्हणाले.
रुपयाची घसरणीवरही शरद पवार स्पष्टच बोलले -
50 पैकी एक ही आमदार हरला तर राजीनामा देईन ह्या शिंदे वक्तव्यावर मला आता काही म्हणायचे नाही, असं शरद पवार यांनी स्पष्ट सांगितलं. रुपयाची घसरणीवर बोलताना शरद पवार म्हणाले की, देशाची अर्थव्यवस्था अडचणीत आहे, केंद्र सरकारची जवाबदारी आहे ती व्यवस्थित ठेवणे.
राऊतांच्या वक्तव्यावर काय म्हणाले पवार?
संजय राऊत हे म्हणाले की शिंदे सीएम नाहीच, खरे सीएम फडणावीसच आहेत, यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, संजय राऊत यांनी दोघांबरोबर काम केलेय. त्यामुळे त्यांना कोणाची काय कुवत आहे ते माहिती आहे.