Deepak Kesarkar : काल अजित पवारांनी दरडावलं, आज केसरकर म्हणाले, आवश्यकता असेल तर घरी जाऊन दिलगिरी व्यक्त करेन
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल मी कधीही अपशब्द काढले नाहीत. आवश्यकता असेल तर मी पवार साहेबांच्या घरी जाऊन त्यांची दिलगीरी व्यक्त करेल असे वक्तव्य आमदार दिपक केसरकर यांनी केलं.
Deepak kesarkar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल मी कधीही अपशब्द काढले नाहीत. माझ्या जीवनाच्या जडण घडणीत ज्या मोठ्या नेत्यांचा वाटा त्यापैकी एक शरद पवार असल्याचे वक्तव्य शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर (Deepak kesarkar) यांनी केलं आहे. आवश्यकता असेल तर मी पवार साहेबांच्या घरी जाऊन त्यांची दिलगीरी व्यक्त करेल असेही केसरकर यावेळी म्हणाले. शरद पवार हे माझ्या गुरुसमान आहेत. त्यांच्याविरोधात मी बोलू शकत नाही. गैरसमज झाला असेल जाहीर दिलगिरी व्यक्त करेन असेही केसरकर यावेळी म्हणाले.
शरद पवार यांच्याबाबत माझ्याकडून कधीच एकही अपशब्द येऊ शकत नाही. शिवसेनेत जी फूट झाली होती, त्यासंदर्भात मी काही वक्तव्य केली होती. ही घडलेली एक वस्तूस्थिती होती. या परिस्थितीचा मी उल्लेख केला. तसेच 2014 साली भाजप आणि शिवसेनेने वेगवेगळ्या निवडणुका लढवल्या. त्यानंतर जे सरकार स्थापन झालं, त्यावेळी पवार साहेबांनी भूमिका जाहीर केली होती. त्यावेळी त्यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा देण्याचे जाहीर केले होते. या घटनांचा आणि पवार साहेबांबद्दल चुकीचं वक्तव्य करण्याचा काही संबंध येत नसल्याचे केसरकर म्हणाले. पवारसाहेब महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आहेत. प्रत्येकाला त्यांच्याविषयी आदर आहे. चुकून जर माझ्याकडून त्यांच्याबद्दल काही अपशब्द गेला असेल तर त्यांच्याबद्दल जाहीर दिलगिरी व्यक्त करतो असेही केसरकर म्हणाले.
जितेंद्र आव्हाड भेटायला आले होते पण....
पवारसाहेबांच्या वतीने मला भेटायला आल्याचे वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. आव्हाड मला भेटायला आले होते हे खरं आहे. मात्र, ते नारायण राणे यांच्या मुलाचा प्रचार करा हे सांगायला आले होते. ते अजिबात पवार साहेबांचा निरोप घेऊन माझ्याकडे आले नव्हते असेही केसरकर म्हणाले. पवारसाहेब ज्या दिवशी सावंतवाडीला आले त्या दिवशीमी माझ्या मतदारसंघात होतो. त्यावेळी मी माझा राजीनामा पवार साहेब यांच्याकडे दिला. तो अत्यंत नम्रपणाने दिल्याचे केसरकरांनी सांगितले. मी तुमच्यामुळे आमदार आहे. मात्र, मी राणे यांच्या मुलाचा प्रचार करु शकत नसल्याचे पावरसाहेबांना सांगितल्याचे केसरकर म्हणाले. मी तुमच्याबरोबर येऊ शकत नाही म्हणून आमदारकीचा राजीनामा देत असल्याचे पावरसाहेबांना सांगितल्याचे केसरकर म्हणाले.