Maharashtra : इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही सभागृहं विरोधी पक्षनेत्यांविना; सरकार शांत तर विरोधकांची आगपाखड
Maharashtra Winter Session : सरकारच्या कामकाज पत्रिकेमध्ये दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेते निवडीसंदर्भात कोणताही उल्लेख नाही. त्यामुळे यंदाचे अधिवेशन विरोधी पक्षनेत्यांविनाच पार पडण्याची शक्यता आहे.

मुंबई : राज्य सरकारचं हिवाळी अधिवेशन यंदा चांगलंच गाजण्याची शक्यता असून त्याचे पडसाद आता उमठत आहेत. राज्य सरकारच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार घातला आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी न करणाऱ्या आणि विरोधी पक्षनेता न निवडणाऱ्या सरकारच्या चहापानासाठी का जाव असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला. घटनेत तरतूद असताना विरोधी पक्षनेतेपद का दिलं जात नाही असा सवालही विरोधकांनी उपस्थित केला. विधीमंडळाच्या अधिवेशनात दोन्ही सभागृहांना विरोधी पक्षनेता नाही अशी इतिहासात पहिल्यांदाच वेळ आली आहे.
Maharashtra Winter Session : दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नाही
विधान परिषदेत ठाकरेंच्या शिवसेनेचे अंबादास दानवे विरोधी पक्ष नेता होते. मात्र गेल्या सत्रात त्यांचा कार्यकाळ संपला असल्याने विधानपरिषदेतही विरोधी पक्ष नेता नाही. यंदाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्ष नेता निवडण्याची शक्यता धूसर आहे. विधिमंडळाच्या कामकाज पत्रिकेमध्ये विरोधी पक्षनेता निवडी संदर्भात कुठलाही उल्लेख नाही. त्यामुळे या अधिवेशनात दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता निवडीवर निर्णय होणार नसल्याची शक्यता आहे. विधान परिषदेमध्ये काँग्रेसकडून सतेज पाटील आणि विधानसभेमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून भास्कर जाधव यांच्या नावाचं पत्र देण्यात आलेल आहे.
Maharashtra Opposition Leader : विरोधी पक्षनेता का नाही?
2024 च्या विधानसभा निवडणुकीत एकाही विरोधी पक्षाला एकूण जागांपैकी किमान 10 टक्के जागा जिंकता आल्या नाहीत. 288 सदस्यांच्या विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्यासाठी एका पक्षाकडे किमान 29 आमदार असणे आवश्यक आहे.
महाविकास आघाडीतील काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्याकडे स्वत:चे तेवढे आमदार नाहीत. ठाकरेंच्या शिवसेनेचे 20, काँग्रेसचे 16 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे 10 आमदार आहेत.
विधानपरिषदेत 78 पैकी काँग्रेसकडे 8, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे 2 तर ठाकरेंच्या शिवसेनेकडे 5 आमदार आहेत. त्यामुळे 10 टक्क्याच्या नियमानुसार काँग्रेसला विधानपरिषदेत विरोधी पक्षनेतेपद मिळू शकतं.
Nagpur Winter Session : चहापानावर बहिष्कार
यंदा प्रथमच विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहाचं कामकाज विरोधी पक्षनेत्यांशिवाय चालणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांकडून चहापानाचं आयोजन करण्यात आलं. मात्र सरकारच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला.
सरकारच्या कथनी आणि करणीत फरक, मग चहापानाला का जावं? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी विचारला आहे. सरकारमध्ये सौहार्द, सज्जनता नाही. विरोधी पक्षनेता निवडीवर सरकार गंभीर नाही असा आरोपही त्यांनी केला. तर विरोधकांच्या विरोधी पक्षनेतेपदाच्या दाव्यावर मात्र भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी टीका केली. विरोधी पक्षनेतेपद मिळावे तेवढे आमदार निवडून आणा असा टोला दरेकरांनी लगावला.
Maharashtra Politics : विविध मुद्द्यांवरुन विरोधक आक्रमक
नागपूरमधील हिवाळी अधिवेशन सोमवार, 8 डिसेंबरपासून सुरू होत आहे. कायदा सुव्यवस्था, महिला अत्याचाराचा मुद्दा, राज्यावरील कर्जाचा डोंगर, शेतकऱ्यांना अपुऱ्या मदतीचा मुद्दा, बेरोजगारी, मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. अधिवेशनात रणनीती ठरवण्यासाठी विरोधी पक्षनेत्यांची बैठक पार पडली.
ही बातमी वाचा:























