Hindu Temple : मंदिरातील दानाचा वापर फक्त हिंदूंसाठी करावा, धर्मावर श्रद्धा नसणाऱ्यांसाठी खर्च नको; विश्व हिंदू परिषदेची मागणी
Hindu Temple Donation : हिंदूंच्या दानातून मिळालेल्या खर्चाचा दुरुपयोग होत असून सरकारी नियंत्रणाखालील मंदिरे हिंदूंच्या व्यवस्थापनेकडे द्या अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे.

नागपूर : हिंदूंनी मंदिरात दान केलेलं धन फक्त हिंदूंच्या कल्याणासाठी वापरला पाहिजे, ज्यांची हिंदू धर्मावर श्रद्धा नाही, जे हिंदू पूजा पद्धतीला मानत नाही त्यांच्यासाठी हिंदू मंदिरात दान आलेलं धन का खर्च करण्यात यावा असा प्रश्न विश्व हिंदू परिषदेने (Vishwa Hindu Parishad) विचारला आहे. हिंदू मंदिरं आणि धार्मिक स्थळं सरकारी नियंत्रणापासून मुक्त करून हिंदू मंदिरांचे व्यवस्थापन हिंदू समाजाला सोपवले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
देशातील हजारो मंदिरांवर सरकारी नियंत्रण असल्याने मंदिरासाठी हिंदूंनी दिलेला दान सरकारी योजनांच्या माध्यमातून, सामाजिक उपक्रमातून बिगर हिंदूंवर खर्च होत आहे. काही ठिकाणी हिंदूंच्या दानातून मिळालेल्या पैशाचा गैरवापर होत आहे. मंदिरांच्या संपत्तीचा ही गैरवापर केला जात आहे. त्यामुळे मंदिर सरकारी नियंत्रणात नको सरकारने सर्व मंदिरे हिंदू समाजाला सोपवलं पाहिजे अशी मागणी विहिप ने केली आहे.
एवढेच नाही तर हिंदू मंदिरं हिंदू समाजाला सोपवण्यासाठीची कार्यपद्धती कशी असावी, मंदिर सरकारी नियंत्रणातून मुक्त झाल्यानंतर कसं कार्य करतील याची एक कार्यपद्धती ही तज्ज्ञांच्या मदतीने विश्व हिंदू परिषदेने तयार करणे सुरू केल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी एबीपी माझाला दिली आहे. सरकारने हिंदू मंदिरं हिंदू समाजाला सोपवण्यासाठी लवकर कायदा करावा अशी अपेक्षाही विश्व हिंदू परिषदेने व्यक्त केली आहे.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर एवढ्या वर्षानंतरही आपण ब्रिटिशांनी लादलेली मंदिरांवरील सरकारी नियंत्रणाची पद्धत आज ही का राबवत आहोत असा प्रश्न ही विहिप ने विचारला आहे.. त्यामुळे विश्व हिंदू परिषदेच्या या मागणीनंतर एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
काय आहे विहिंपचा मंदिर व्यवस्थापन प्लान?
- सरकारच्या नियंत्रणात असलेले मंदिर सरकारी नियंत्रणातून मुक्त व्हावे आणि हिंदू समाजाच्या नियंत्रणात द्यावे.
- धार्मिक स्थळावर सरकारी नियंत्रण फक्त मंदिरांवर असणं, आणि चर्च, मशिदीवर तसं नियंत्रण नसणं हे हिंदू धर्मियांसोबत पक्षपातपूर्ण व्यवहार आहे.
- हिंदू समाजाने हिंदू मंदिरांचे संचालन केलं पाहिजे. मंदिरांच्या व्यवस्थापनामध्ये समाजातील प्रत्येक घटकाचा समावेश असायला हवं.
- हिंदूं मंदिरात दान म्हणून आलेलं धन हिंदूंच्या लाभासाठीच वापरला गेला पाहिजे.
- ज्यांची हिंदू देवतांवर श्रद्धा नाही, जे हिंदू पूजा पद्धतीला मानत नाही, ते बिगर हिंदू धर्मीय हिंदू धनाचे लाभार्थी का असावे?
काही संत, काही कायदेतज्ञ यांची मदत घेऊन विश्व हिंदू परिषद सर्व मंदिरे हिंदू समाजाला सोपवण्याची कार्यपद्धती कशी असावी? मंदिर सोपवल्यानंतर त्याचे व्यवस्थापन कोणी सांभाळावे? व्यवस्थापन समितीसाठी ट्रस्टी कोणी निवडावे? यासाठी एक मॉड्युल तयार करत आहे. सुरुवातीला विश्व हिंदू परिषदेने तयार केलेल्या मॉड्युलची अंमलबजावणी एका राज्यात प्रायोगिक तत्वावर केली जाईल. त्यानंतर संपूर्ण देशात त्याची अंमलबजावणी अपेक्षित आहे. मध्यप्रदेशमध्ये या प्रयोगाची अंमलबजावणी पहिल्यांदा होणे अपेक्षित आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
