मुंबईला पुरविले जाणारे पाणी निर्जंतुकीकरण केलेले, BMC प्रशासनाचे स्पष्टीकरण
BMC : मुंबई महानगराला सर्वोत्तम शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन अथक कार्यरत असल्याचं मुंबई महापालिकेने म्हटलं आहे.
BMC : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पुरविले पाणी हे निर्जंतुकीकरण आणि इतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून पुरविले जाते. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पाणीपुरवठ्याच्या दर्जा हा ९९.३४ टक्के इतका सर्वोत्तम शुद्ध असल्याचे केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन कार्यक्रमातून देखील सिद्ध झाले आहे. सर्वोत्तम पाणीपुरवठ्यासाठी महानगरपालिकेला आजपर्यंत अनेक सन्मान मिळाले आहेत. सर्वोत्तम शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी महानगरपालिका सदैव कटिबद्ध आहे असं महापालिका प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.
मुंबई महानगराला होणाऱ्या पाणीपुरवठ्याविषयी मुंबईकर नागरिकांच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होवू नये या दृष्टीने स्पष्ट करण्यात येते की, मुंबईतील विहार, तुळशी तसेच मुंबईपासून सुमारे १०० ते १७५ किलोमीटर अंतरावर असलेल्या तानसा, मोडक सागर, अप्पर वैतरणा, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा आणि भातसा या सात जलाशयांद्वारे मिळून मुंबईला दररोज ३९५० दशलक्ष लीटर एवढा पाणीपुरवठा करण्यात येतो. या सातही जलाशयांमधून वाहून आणलेले पाणी भांडूप संकुल व पिसे पांजरापूर संकुल येथे आणल्यानंतर तेथील जलप्रक्रिया केंद्रामध्ये, दररोज पाण्याचे शुद्धीकरण तसेच निर्जंतुकीकरण केले जाते. तेथून पुढे २७ सेवा जलाशयांमध्ये देखील पाण्याचे वितरण करण्यापूर्वी निर्जंतुकीकरण केले जाते. एकूणच जलवाहिन्यांमधून मुंबईकर नागरिकांपर्यंत पाणी पोहोचेपर्यंत पाणी निर्जंतुक राहिल याची महानगरपालिका प्रशासनाकडून पुरेपूर काळजी घेतली जाते.
मुंबईकरांना अखंड, शुद्ध आणि पुरेसा पाणीपुरवठा करणे हे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कर्तव्य आहे. सातही जलाशयांमध्ये उपलब्ध असलेले पाणी शुद्धीकरणासाठी २२३५ मिलिमीटर ते ५५०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनी आणि बोगद्यातून पांजरापूर (प्रतिदिन १३६५ दशलक्ष लीटर), भांडुप संकुल (प्रतिदिन २८१० दशलक्ष लीटर), विहार (प्रतिदिन ९० दशलक्ष लीटर), तुळशी (प्रतिदिन १८ दशलक्ष लीटर) येथे आणले जाते. जल शुद्धीकरण केंद्रामध्ये पाणी पोहचल्यानंतर या ठिकाणी कोऍग्युलेशन, फ्लोक्युलेशन, सेटलिंग, रॅपिड सॅण्डफिल्टर, आणि पोस्ट क्लोरीनेशन इत्यादी सर्व प्रक्रिया करुन पाणी सर्वोत्तम शुद्ध केले जाते.
विहार व तुळशी तलावामध्येस महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था (मेरी, नाशिक) व मेरीटाईम बोर्ड यांच्या मार्फत गाळ सर्वेक्षण करण्या त आले आहे. त्यानचा अंतिम अहवाल अद्याप प्राप्त् झालेला नाही. सदर अहवाल प्राप्तव झाल्याफनंतर पुढील योग्यर ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे.
पाणीपुरवठ्यासाठी जलाशयांचे नियोजन करताना पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाण्यासमवेत काही प्रमाणात गाळ येणार हे गृहीत धरलेले असते. त्यानुसारच जलाशयांची भौगोलिक रचना केलेली असते. तथापि, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या तानसा, मोडक सागर व मध्य वैतरणा या प्रमुख तीन जलाशयांचा गाळ सर्वेक्षण अहवाल तयार करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारितील महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे. या संस्थेने तानसा व मध्य वैतरणा धरणांचा गाळ सर्वेक्षण अहवाल सादर केला आहे. त्यानुसार, मध्य वैतरणा धरणाच्या वार्षिक जल साठवण क्षमतेत अवघी ०.२४४ टक्के, तर तानसा धरणाच्या वार्षिक जल साठवण क्षमतेत अवघी ०.११६ घट आढळून आली आहे. तानसा तलावाबाबत संबंधित संस्थेने वार्षिक चल साठवण क्षमतेची घट नगण्य आहे व त्यामुळे तानसा धरणाच्या पाणीपुरवठा क्षमतेवर कोणताही परिणाम आढळून येत नाही, असे कळविले आहे.
जलाशयामध्ये गाळ जमा होण्याचा दर तसेच चल साठ्यातील घट ही गाळ उपसण्यासाठी किती असावी, याबाबतचे तांत्रिक निकष, सूचना, तांत्रिक निर्देश उपलब्ध नाहीत, असेही ‘मेरी’कडून कळविण्यात आले आहे. मोडक सागर जलाशयाचा गाळ सर्वेक्षण अहवाल तयार करण्याचे काम ‘मेरी’मार्फत प्रगतिपथावर आहे. अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल. तसेच मुंबईस पाणीपुरवठा करणारी उर्वरित अप्पर वैतरणा व भातसा ही धरणे राज्य शासनाच्या पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत येतात.
एकूणच, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून पुनश्च एकवार स्पष्ट करण्यात येते की, जलाशयांमधून गाळ काढणे आणि पाणी शुद्धीकरण करणे व निर्जंतुकीकरण करणे या दोन्ही पूर्णपणे स्वतंत्र प्रक्रिया आहेत. त्यांचा एकमेकांशी संबंध जोडणे जलअभियांत्रिकी दृष्टीने योग्य ठरत नाही. मुंबई महानगराला सर्वोत्तम शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन अथक कार्यरत असून, त्यासाठी महानगरपालिकेला मिळालेले सन्मान ही त्याची पोच पावतीच आहे.